बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : अंबरनाथ तालुक्यातील राहटोलीतील शेतकरी अय्याज पोंजेकर यांच्या तीन म्हशींचा वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे; मात्र याबाबत तक्रार करूनदेखील महावितरणचे कोणीही अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी फिरकले नाहीत. त्यामुळे या घटनेविरोधात ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. वादळी वारा व पावसामुळे अनेक ठिकाणी महावितरणच्या तारा आणि विद्युत पोल वाकलेल्या स्थितीत आहेत; तर काही ठिकाणी या विद्युत वाहिन्या अशाच स्थितीत कार्यान्वित असून यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अशी भीती असतानाही महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
नेहमीप्रमाणे म्हशी चरण्यासाठी रानात जात असताना राहटोली येथे जमिनीवर पडलेल्या वीज वाहक तारांचा शॉक लागला. यात तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शेतकरी अय्याज पोंजेकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना फोन करून कळवले; मात्र महावितरणचे कोणतेही कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी फिरकले नाहीत. या तीन म्हशींचा मृत्यू झाल्याने महावितरणकडे नुकसानभरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे. तसेच वादळी पावसाने अचानक तडाखा दिल्यानंतर अशा काही घटना घडण्याची भीती आहे. तसेच अशा प्रकारे जमिनीवर पडलेल्या वीज वाहक तारांमुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
