मुरबाड : मुरबाड ते कल्याण बस भाडे शुक्रवारपासून (ता. २४) दहा रुपयांनी कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामुळे रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची रोज प्रत्येकी वीस रुपयांची बचत होणार आहे. एसटीच्या भाडेवाढीसंदर्भात सकाळमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता एसटी प्रशासनाने भाडेवाढ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुरबाड ते कल्याण बस मार्गाच्या वाहतुकीत बदल झाल्याने एसटी प्रशासनाने या मार्गावरील भाडे रुपये ४५ ऐवजी रुपये ५५ केले होते; मात्र हा बस मार्ग फक्त कागदोपत्री बदलण्यात आला होता. वाढीव चार किलोमीटर अंतराच्या मार्गाने बस जा-ये करत नव्हत्या, याबाबत प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच भाडे कमी न केल्यास मुरबाड येथील वकील किशोर गायकवाड यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. तसेच याबाबत सकाळमध्ये ५ मे रोजी सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ दुरुस्तीचे काम सुरू झाले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मुरबाड कल्याण बस मार्गावरील वाहतूक दुर्गाडी पूलमार्गे वळवण्याचे आदेश एसटी प्रशासनाला दिले होते. या मार्गात बदल झाल्याने मुरबाड ते कल्याण मार्गावरील वाहतुकीचे अंतर चार किलोमीटरने वाढल्याचे कारण देत एसटी प्रशासनाने मुरबाड ते कल्याण बसभाडे ४५ ऐवजी ५५ रुपये केली; परंतु प्रत्यक्षात या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस दुर्गाडी मार्गाने न जाता रामबागमार्गे सुरू होत्या. त्यामुळे वाढीव प्रवास भाडे कमी करावे, अशी प्रवाशांची मागणी होती.
आडमुठी भूमिका
एसटी प्रशासन मात्र जोपर्यंत वाहतूक पोलिस विभाग जुन्या मार्गाने वाहतूक सुरू करण्याबाबत लेखी आदेश देत नाहीत, तोपर्यंत भाडे कमी केले जाणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेत होते. अखेर वाहतूक पोलिसांनी या मार्गात बदल करण्याचा आदेश काढल्याने शुक्रवारपासून दहा रुपये भाडे कमी करण्याचा आदेश एसटी महामंडळाच्या ठाणे येथील विभाग नियंत्रक कार्यालयाने काढला आहे, अशी माहिती मुरबाड आगार व्यवस्थापक योगेश मुसळे यांनी दिली.
