विशेष
राजेंद्र साळसकर
मुलांची परिक्षा संपली आणि उन्हाळ्यची सुट्टी पडली की, पालकांच्या मनावरील एक ताण सैल होतो पण त्याचबरोबर एक नवा ता मनावर प्रभाव टाकायला सुरूवात करतो आणि तोच अधिक अस्वस्थ करणारा असतो. मुलांना आता शाळेला सुट्टी पडलीय! या सुट्टीत मुलांनी करायचं तरी काय? फक्त टि.व्ही., सिनेमा,वाचन, बेठे खेळ आणि काम्प्युटर गेममध्ये रमायचं, गाणी ऐकायची? नेमकं करायचंढ तरी काय?एकीकडं पालकांच्या मनावर हा दुसरा ताण प्रभाव टाकत असतानाच मुलांच्या बाबतीत म्हटलं तर मुलांना परिक्षा संपल्याने परिक्षेचा ताण संपलेला असून, शाळेला सुट्टी पडलेली असल्यामूळे, ‘नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा’ या आविर्भावात मुले वावरत असतात. अशावेळी मुलांना आपल्या गावी विशेषत: मामाच्या गावी जाण्याची ओढ त्यांच्या मनात अधिक असते.
‘झुक -झुक, झुक-झुक आगीन गाडी, पडती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊया’ अशी गाणी त्यांच्या मनात रूंजी घालू लागतात.मामाचं कौलारू घर, घरासमोर तुळशी वृंदावन, औदु़ंबराचं झाड, पारिजातक, परसात रायवळ,बिटकी आंब्याची झाडं सारं काही मनमोहक असायचं. मुले पहाटे-पहाटेच मामाच्या परसातल्या पडलेल्या फणसावर ताव मारायची. दुपारची उन्हं वाढू लागताच सारी मुलं एकत्र होऊन नदी – ओढ्यातील जलकु़ंडात पोहण्यासाठी एकत्र जमायची.
नदीतील जलकुंडात डुबकत- डुबकत लपाछपी खेळत वेळ केव्हा निघून जायचा समजतही नसे. मग या मुलांची स्वारी वळायची करवंद जांभळावर. करवंद, जांभळाची चव चाखत चाखतच मुलं दुपारच्या जेवणासाठी आपल्या घराकडे परतायची. आंब्याच्या रायत्यावर ताव मारत मुलं यथेच्छ जेवायची. मग दुपारी रंगायचा तो पत्त्यांचा डाव. मु़ंगुस, राणी, गुलाम, बादशाह खेळता – खेळता दुपार केव्हा सरायची हे समजतही नसे. दुपारच्यावेळी भर उन्हात मामाच्या अंगणात मुलांचा धुडगूस सुरू असायचा. संध्याकाळी मामाबरोबर बैलगाडीत बसून हिंडताना तसेच रानावनात फिरून – फिरून सारी मुलं दमून जायची. रात्री जेवणाची पंगत उठल्यानंतर सारी मुलं आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी त्यांच्याभोवती जमायची.गोष्टी ऐकता-ऐकता दिवसभर थकलेली मुलं केव्हा निद्राधीन व्हायची ते त्यांनाही समजत नसे.
हा झाला सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीपासूनचा कालखंड.मात्र आजच्या इंटरनेटच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मामाचा गाव कुठंतरी हरवलाय असं चित्र दिसू लागलंय.मे महिन्यात मामाच्या गावाला जाण्याची मुलांच्या मनातील ओढ कमी होऊ लागल्याचं दिसू लागलंय. मुलांच्या मनातील असणारी मामाच्या गावाची क्रेझ दिवसागणिक कमी होत चालल्याचं दिसतंय. मे महिन्यात मामाच्या गावाला जाण्याऐवजी आजच्या पिढीतील व इंटरनेटच्या युगातील मुले अंड्राईड मोबाईलची प्रतिक्षा करू लाग़ली आहेत.आंबा- फणसाखाली मेसेज वाचण्यात,चेटिंग करण्यात व इतरांना सेंड करण्यात रममाण होताना दिसत आहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर मौजमजा करणारी मुले आता एकलकोंडी होऊ लागली आहेत.कैंडी क्रश, सब वे सफर,एंग्री बर्ड असे दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असताना आता मोबाईलच त्यांचा सखासोबती बनला आहे.
साधारणत: अभ्यासाव्यतिरिक्त एका जागी खिळून राहणं मुलांना शक्य नसतं, तसा त्यांचा पिंडही नसतो. एखादा छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं म्हटलं तर दिवसभर त्यात ती गुंतून राहतील असंही नाही. दिवसाकाठी एखाद्या छंदात ती दोन-तीन तास रमतील.मग दिवसभराचा मोकळा वेळ त्यांनी घालवायचा कसा?एंड्राईड मोबाईलवरील व्हाट्सअप, फेसबुक व गेममध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांनी तो सत्कारणी वापरला तर त्याचा त्यांना भावी आयुष्यात आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी व स्वयंपूर्णतेसाठी निश्चितच लाभदायक ठरू शकतो.
एक तर अनेकांना त्यांचं गावच नसतं. ज्यांचं असतं त्यांना मुलं दृष्टिआड होणं पसंत नसतं.समजा गावी जायचं म्हटलं तर आफिसात नेमकी मेनपावर नसल्यामुळं रजा मिळत नाही. एकटं पाठवण्याचा पर्याय निवडला तर तिथं ही मुलं काय वेगळा पराक्रम करून बसतील याचीही चिंता सतावत रहाते.
मात्र गेल्या काही वर्षापासून अनेक संस्था आणि व्यक्तींनी मुलांसाठी सुट्टीतील शिबिरे आयोजित करायला सुरूवात केलीय.अशा शिबिरांना प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे.ही शिबिरं विविध स्वरूपाची असतात.छंदवर्ग,कलावर्ग, अभिनय वर्ग, साहस वर्ग, आत्मविश्वास वाढविणारी लकब शिकविणारे वर्ग, खेळ आत्मसात करण्याचे वर्ग अशा अनेक उपक्रमांना या शिबिरात प्राधान्य दिलं जातं. ही शिबिरं एप्रिल ते जून या कालावधीत भरविली जातात. सहभागी होणा-या प्रत्येक मुलाच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतूने शिबिराचा कार्यक्रम आखलेला असतो.
शिवाय ज्या मुलांना पालकांच्या शिवाय रहाण्याची सवय नाही अशा मुलांचा विचारही शिबिर भरवताना केलेला असतो.सर्व वयोगटातील व्यक्तींना या शिबिरात सहभागी होता येत असल्यानं, मुलांबरोबर पालकांनाही शिबिरात उपस्थित रहाता येतं.या शिबिराचं वैशिष्ट्य असं की, भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करतानाच मुलांना पालकांशी व पालकांना मुलांशी संपर्क साधता यावा यासाठी एसटीडी दुरध्वनीची व्यवस्थाही ठेवण्यात येते. याचबरोबर मोबाईल फोनचीही सुविधा असल्याने आता जलदगतीने संपर्क साधणे सोपे झाले आहे. त्यामुळे पालकांपासून दूर रहाण्याची सवय नसणा-या मुलांना क्वचितच होम सिकनेस आला तर फोनवरून पालकांशी बोलता येतं आणि पालकांनाही कोणत्याही वेळी आपल्या मुलांशी संपर्क साधता येतो. एखादा मुलगा कंटाळलाच तर त्याचा पालकांशी संपर्क साधून घरी घेऊन जाण्यासाठी सुचविता येतं.किंवा मुलाला कोणत्या गाडीनं पाठवित आहोत ते पालकांना कळविणं सोपं जातं.मात्र अशी वेळ सहसा येत नाही.कारण की,या शिबिरात इतके गडगंज कार्यक्रम आखलेले असतात की, मुलांना त्याची गोडी तर वाटतेच पण आपल्या नव्या सवंगड्यात ती कमालीची रमतात.
अशा शिबिराची आखणी करताना आयोजकांनी काही महत्वाच्या गोष्टी विचारात घेतलेल्या असतात.मुलांची मानसिकता आणि मुलांचं संस्कारक्षम वय याचा विचार करूनच शिबिरातील अभ्यासक्रम आखण्यात येत असतो.एप्रिल ते जून या कालावधीत दहा दिवसां ची एक बेच याप्रमाणे विविध गटात ही शिबिरे होतात आणि यात होणारे कार्यक्रम मुलांना अनेक विषयात पारगंत करतात. व्यायाम, निशस्त्र युद्ध(मार्शल आर्ट्स) शावोलीन कुंग -फु यांचे प्रशिक्षण दिले जाते.मुलांच्या मनात यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. हे प्रशिक्षण या क्षेत्रातील तज्ञ असणा-या व्यक्तींकडून दिले जाते. क्षमता वाढविण्यासाठी निवृत्त लष्करी कमांडोंकडून धावणे,मिलिटरी परेड,रोप क्लाईम्बिंग, व्हर्टिकल रोप, मंकी क्राऊलिंग रोप,स्विंग सेक्शन, लोंग जम्प,तिरंदाजी, स्विमिंग,होर्स रायडिंग आदिंचे तंत्र घोटवून घेतले जाते.या पायाभूत प्रशिक्षणाचा परिणाम मुलांमधील साहसीवृत्ती विकसित होण्यात होतो.
इंटरनेट व माहितीयुगाबरोबरच सध्याचं युग हे स्पर्धेचंही आहे हेही ध्यानात घेणं आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात पदार्पण करण्यापासून ते स्थिरावण्यापर्यंत स्पर्धाच करावी लागते. स्पर्धेत टिकण्यासाठी उपजत असणारी बुद्धी विकसित करावी लागते.
नजरेत चौकसपणा निर्माण करण्याची गरज असते.काम करण्याची क्षमता किंवा स्टेमिना वाढविण्याची आवश्यक्ता असते. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाकडे चौकस व्यक्तीमत्व असावं असं वाटतं आणि ते उपजतच असतं असा पालकांचा गैरसमज असतो.प्रत्यक्षात शास्त्रशुद्ध रितीनं प्रशिक्षण दिलं गेलं,मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला,त्याला स्वयंशिस्तीची जोड दिली तर त्याचं संस्कारक्षम मन नवनवीन कला शिकण्यात अधिक रस घेतं आणि त्यात झटकन पारंगतताही प्राप्त करतं.
आत्मविश्वास जागृत करून स्वयंशिस्तीचे धडे देण्याच्या अभ्यासक्रमाबरोबरच टेबल टेनिस, टेबल पूल, लोन टेनिस, होली बोल, बुद्धीबळ, क्रिकेट, फुटबोल, केरम या खेळातील शास्त्रशुद्ध तंत्र शिकवून मुलांना चौकस बनविले जाते.या खेळातून तंत्राबरोबर बुद्धिमत्ता आणि अचूक अंदाज बांधण्याची क्षमता याचा कस लागत असतो.या शिबिरातून घेतलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाचा मुलांना भविष्यात निश्चितच उपयोग होत असतो.तेव्हा अशाप्रकारच्या शिबिराचा लाभ शालेय मुलांनी आणि आजच्या युवापिढीने घेतल्यास त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल.
हे सर्व खरे असले तरी अशा शिबिरात आपले किंवा आपल्या पाल्याचे नाव नोंदण्यापूर्वी आपण ज्या संस्थेत नाव नोंदणार आहोत त्या संस्थेची संपूर्ण माहिती नेटवरून काढणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या संस्थेला अशाप्रकारे शिबिरे आयोजित करण्याचा किती वर्षांचा अनुभव आहे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच ती संस्था या क्षेत्रातील नोंदणीकृत व नामांकित आहे की नाही याची माहिती काढणे आवश्यक आहे. अशाप्रकारे भाराभर ऐक्टिव्हिटीज व खोट्या आश्वासनांच्या जाहिराती करून बक्कळ पैसा उकळून लुटमार करणा-या संस्थांचाही अलिकडे सुळसुळाट झाला आहे हेही तितकेच खरे.
तेव्हा पालकांनी आपल्या पाल्याचं नाव नोंदणीकृत व या क्षेत्रातील नामांकित संस्थेची पूर्ण माहिती काढल्यावरच नोंदवावे. योग्य संस्थेत आपल्या पाल्याचे नाव नोंदवल्यास ती मुले अशा शिबिरातून व्यक्तीमत्व विकासाचे व स्वयंशिस्तीचे धडे अंगी बाणवूनच या शिबिरातून बाहेर पडतील आणि याचा त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात निश्चितच फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही.