अनिल ठाणेकर

ठाणे : महापालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशीरा सुरू झाले असले तरी आता ते सरासरी ६० टक्के झाले आहे. हे काम वेगाने सुरू असून ३१ मेपर्यंत सगळे काम पूर्ण होईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे, अशी माहितीही आयुक्त राव यांनी दिली. शुक्रवारी महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रथम, कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याचा कामाचा आढावा घेतला. रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यांवर जाळ्या बसवाव्यात. त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा. म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल. त्यादृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच, स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक यांची मदत घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.त्यानंतर, उथळसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नालेसफाईचे काम आयुक्तांनी पाहिले. वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला, थिराणी नाला, वागळे इस्टेट मधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला, नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतचा नाला, परब वाडी येथील नाला येथे आयुक्त राव यांनी पाहणी केली. यावेळी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन नालेसफाईचे काम आणखी जलद करावे. तसेच, नाले, गटारे यातून काढलेला गाळ तातडीने उचलावा, याचा आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *