विरार : वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित २८६ वा वसई विजयोत्सव मोठ्या जल्लोषात वसई किल्ला येथे साजरा झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसई किल्ल्याचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू व येथील पर्यटन, लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृतीची माहिती जास्त नागरिकांपर्यंत पोहचून येथे जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने वसई विरार शहर महानगरपालिका दरवर्षी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, वसई किल्ला येथे वसई विजयोत्सव दिनाचे आयोजन करते.
कार्यक्रमाचा शुभारंभ परंपरेप्रमाणे श्री वज्रेश्वरी देवी मंदिरात उपायुक्त सदानंद पुरव यांचे हस्ते पुजा अर्चना करुन व माजी महापौर राजीव पाटील ,माजी सभापती पंकज ठाकूर, माजी नगरसेवक विलासबंधू चोरघे, माजी सभापती प्रितेश पाटील, वज्रेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष यांचे उपस्थितीत मशाल प्रज्वलित करुन मशाल रॅलीचा शुभारंभ करण्यांत आला. मशाल रॅली करिता वसई तालुका कला क्रीडा मंडळांचे सदस्य,वसई हायकर ग्रुप व आमची वसई संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मशाल रॅलीचा मार्ग वज्रेश्वर मंदिर ते वसई किल्ला असा होता यामार्गावर टप्या- टप्यावर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती पेल्हार, वालिव, आचोळे, नवघर व वसईचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येंने पारंपारिक पोशाखात सहभागी झाले होते. तसेच मशाल रॅली मार्गांवर नागरिकांतर्फे मशाल रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत देखील करण्यांत आले. सायंकाळी ५:३० वाजता मशालरॅली पारनाका येथे पोहोचल्यानंतर परंपरेनुसार प्रभाग समिती आय मार्फत मशालरॅलीचे स्वागत करुन पुढे ढोलताशा व लेझीम समवेत शेकडोच्या संख्येने उपस्थित विविध सेवाभावी संस्था ,नागरिक व कर्मचारी यांचे मार्फत मशाल नरवीर चिमाजी आप्पा स्मारक वसई किल्ला येथे नेण्यात आली.
मा.आमदार क्षितिज ठाकुर, मा.आयुक्त अनिलकुमार पवार यांचे हस्ते नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यांत आला.
तसेच, बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आमदार क्षितिज ठाकुर व आयुक्त अनिलकुमार पवार तसेच वसई विजय स्मारक समितिचे सदस्य बबनशेठ नाईक, यशवंत पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी महापौर प्रविण शेट्टी, माजी महापौर नारायण मानकर, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, संतोष वळवईकर, राजन नाईक, प्रफुल्ल ठाकुर तसेच सर्व पक्षिय पदाधीकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
