उल्हासनगर : ब उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे मार्फत सुरू असलेल्या ७ रस्त्यांच्या विकास कामाबाबत उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजिज शेख यांचे अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहामध्ये आढावा बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अर्जुन कोरगांवकर, अधिक्षक अभियंता धाबे, सहा. संचालक नगर रचना ललित खोब्रागडे, शहर अभियंता संदिप जाधव, कार्यकारी अभियंता पी. व्ही. बुडगे, व हनुमान खरात, तसेच संबधित कामांचे कंत्राटदार व सल्लागार उपस्थित होते.
उल्हासनगर शहरामध्ये सुरू असलेल्या ७ रस्त्यांच्या विकास कामे पूर्ण करणेबाबत गती देण्यासाठी येणाऱ्या अडचणी सर्व संबंधित कंत्राटदार यांच्याकडून ऐकून घेतल्या व त्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या. रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नगरचना विभागाचे सहाय्यक संचालक ललित खोब्रागडे यांनी विकास आराखड्याप्रमाणे सीमांकन करून विहित नोटीसा प्रभाग अधिकारी यांनी बजावून लोकांची बाजू ऐकून कार्यवाहीस गती देण्याबाबत यावेळी सुचित केले.
रस्त्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे येणारे खांब व ट्रान्सफॉर्मर आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत मागील बैठकीत दिलेल्या सूचनाप्रमाणे प्राप्त अहवालाची माहिती घेऊन एमएमआरडीएने याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
रस्त्यात येणाऱ्या झाडांच्या बाबतीत विहित प्रक्रियेने झाडांचे स्थलांतर करून झाडे जगवण्यासाठी कारवाई करण्याची उद्यान विभागास सूचना केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे .
मलनिस्सारण योजनेची कामे व रस्त्यांची कामे परस्पर समन्वयाने मार्गी लागण्यासाठी दोन्ही कामांचे कंत्राटदार यांचा संयुक्त आढावा घेण्यात आला व त्यास गती देण्यासाठी सुचित केले.
विकास कामे सुरू असलेल्या ठिकाणी धुळ उडून प्रदूषण होणार नाही. यासाठी पाणी फवारणी करण्यात यावी व ज्या रस्त्यांचे मलवाहिणी टाकुन काम पूर्ण झाले आहे त्या रस्त्यावर तात्काळ पाणी मारून दबाई करून रस्त्याचे प्रकारानुसार डांबरीकरण किंवा कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण करावे असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी या बैठकीत दिले .
कामांची गती वाढावी यासाठी दर आठवड्याला अशी बैठक आयोजित करण्यात येणार असून याबाबतीत नागरिकांच्या तक्रारींची दखल त्वरित घेऊन उपाय योजना करून काम वेत वेळेत पूर्ण करावे अशी आयुक्तांनी सूचना दिली.