पालघर : शाळांना उन्हाळी सुटी, तसेच लोकसभेसाठी मतदान झाल्याने मोकळेपणा मिळावा म्हणून नागरिक सहकुटुंब घराबाहेर पडत आहेत. मुंबई, ठाणे, नाशिकसह गुजरात राज्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे केळवे, बोर्डी, शिरगावमधील समुद्रकिनारे. उष्णतेने कहर केल्यावरसुद्धा जिल्ह्यातील समुद्रकिनारे पुन्हा पर्यटकांनी फुलू लागले आहेत.

पालघरमधील शांत, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांचे शहरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षण आहे. शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षा, तसेच निवडणुकीचा हंगाम संपल्याने पर्यटकांनी केळव्याकडे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या ठिकाणी दररोज हजारो प्रवासी येत आहेत. केळवा हे सुरक्षित ठिकाण आहे. तसेच पालघर, बोईसर, डहाणू, विरार, सफाळे येथे कौटुंबिक पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लांबलचक समुद्रकिनारा केळव्याला लाभला असून या किनाऱ्याच्या आकर्षणामुळे पर्यटक येथे आवर्जून हजेरी लावतात. याचबरोबर शीतलादेवीचे भव्य मंदिर, निसर्गसौंदर्य ठिकाण असल्याने पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात येत असतात. या पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. मोठ्या प्रमाणात शहाळी, रानमेवा, चिंचा, ताडगोळे या बरोबरीने अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल किनाऱ्यावर पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.

व्यावसायिकांनाही चांगले दिवस

समुद्रकिनाऱ्यावर घोडा गाडी, उंट, त्याचप्रमाणे समुद्रातील बोटिंग, बीच बग्गी याचा आनंदही पर्यटक मोठ्या प्रमाणात लुटत आहेत. मुलांच्या परीक्षा संपल्या असल्या तरीही कडक उन्हामुळे सुट्टी संपण्याच्या वेळी पर्यटकांनी पुन्हा आपले पाय समुद्रकिनाऱ्याकडे वळवले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही चांगले दिवस आले आहेत. समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण असल्याने हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे येथे उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटकांची गर्दी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *