मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट

मुंबई : महाराष्ट्र दिवसागणिक अधिकाधीक तापू लागलाय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तर उष्णतेची लाट आलीय. अकोला, जळगाव ही शहरात तर सुर्यदेव इतका कोपला आहे की येथे कमाल तापमान ४५ अंशावर पोहचले आहे. या वाढत्या तापमानामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून जळगावात तर जमावबंदीचे १४४ कलम लागू करावे लागले आहे.

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २५ मे पासून ३ जूनपर्यंत जमावबंदीचे १४४ कलम लागू केले आहे. नागरिकांनी दिवसा उन्हात बाहेर फिरू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

येत्या पाच दिवसांमध्ये अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस, तर मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात व विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट् चांगलाच तापत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हे उष्ण झळांनी भाजून निघत आहेत. तर राज्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोल्यात झाली. पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. देशामध्ये राजस्थानातील बारमेरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८.८ अंश तापमान नोंदले गेले.

धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता आहे. यातील अकोला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमान असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान तापमान वाढल्यामुळे जळगावात कलम १४४ लागू केले. हे पहिल्यांदाच ऐकत आहे. तापमान वाढल्याने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. परंतु, नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून या सूचना दिल्या असाव्यात अशी प्रतिक्रीया भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. अनुपम कश्यपीयांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *