शुभेच्छा
अविनाश पाठक
नागपूर हे शहर देशाचे हृदयस्थान मानले जाते. या शहराने देशाला खूप काही दिले आहे. आज जगातील सर्वात मोठे सामाजिक, गैरराजकीय संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूरातच झाली आहे. त्याचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देखील नागपूरकरच आहेत. याच नागपूर शहरात देशातील पददलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मक्रांती देखील घडवून आणत अशा सर्व दलितांना बौद्ध धर्मातआणले आहे. एकूणच देशात क्रांती घडवणारे ऐतिहासिक शहर म्हणून नागपूरची ओळख आहे.
या शहराने अनेक थोर नर रत्ने भारताला दिली आहेत. कॉम्रेड ए बी बर्धन यांच्यासारखे डाव्या विचारसरणीचे राष्ट्रीय नेते ही नागपूरचीच देण आहे. भारतीय जनसंघाचे १९६५-६६ या कालखंडातील राष्ट्रीय अध्यक्ष पंडित बच्छराज व्यास हे देखील नागपूरकरच होते. इतरही धर्मवीर डॉक्टर मुंजे, कामगार नेते रामभाऊ रुईकर, क्रिकेटवीर सी. के.नायडू असे अनेक थोर व्यक्ती नागपूरकर आहेत.
असे असले तरी संपूर्ण भारतवर्षाचे नेतृत्व करणारे व्यक्तित्व अजून या शहराने भारताला दिले नाही ही आजवर अनेकांची खंत होती. देशाच्या पंतप्रधानपदी किंवा राष्ट्रपतीपदी एकही नागपूरकर आजवर पोहोचलेला नव्हता, इतकेच काय तर त्याचे नावही कधी चर्चेत आलेले नव्हते.
नागपूरचे सोडा, पण नागपूर शहर ज्या महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखली जाते त्या महाराष्ट्रतूनही एकही व्यक्ती देशाची पंतप्रधान झालेली नाही. नाही म्हणायला २००७ ते २०१२ या कालखंडात अमरावतीच्या प्रतिभा पाटील या मराठी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपती झाल्या होत्या. त्यानंतर कोणीही मराठी व्यक्ती राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचली नाही. पंतप्रधानपदासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पासून तर आजच्या शरद पवारांपर्यंत अनेक नावे घेतली त्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे देखील होते.मात्र त्यातल्या कोणालाही पंतप्रधान होण्याची संधी मिळालेली नाही.
देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती या पदासाठी २०१० पर्यंत नागपुरातून कोणाचेही नाव कधीही चर्चेत आले नव्हते. मात्र २०१० पासून एक नाव वारंवार चर्चेत येऊ लागले. आजही राजकीय वर्तुळात जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला काही जागा कमी पडल्या तर पंतप्रधानपदासाठी सर्वमान्य उमेदवार म्हणून जे नाव घेतले जाते ते एका नागपूरकर व्यक्तीचेच आहे, ते म्हणजे नितीन जयराम गडकरी….
नितीन गडकरी चे नाव नागपूरच्या राजकीय क्षितिजावर १९८० पासून घेतले जाऊ लागले. तर महाराष्ट्राच्या क्षितिजावर गडकरींची ओळख १९९५ पासून झाली .आज गडकरी हे राष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणून ओळखले जातात. २०१० मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हापासून पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून त्यांचे नाव घेऊन गेले जाऊ लागले. आजही त्यांचे नाव अधून मधून चर्चेत येतच असते.
आज हा लेख लिहीत असतानाच वृत्तवाहिन्यांवर दैनिक सामना मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रोखठोक शीर्षकाखाली लिहिलेल्या एका लेखाबद्दल चर्चा सुरू असलेली दिसते आहे. प्रस्तुत लेखात संजय राऊत यांच्या मते नितीन गडकरींना पाडण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा आणि नागपूरकर असलेले देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र आले होते. राऊत यांच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे हे तेच जाणोत ,मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून गडकरींना उमेदवारीच मिळणार नाही अशा अटकळी बांधल्या गेल्या. नंतर गडकरींना उमेदवारी तर मिळाली पण त्यांना पाडण्यासाठी नरेंद्र मोदीच स्वतः सक्रिय आहेत अशा चर्चाही झाल्या. मतदान आटोपून आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, तरीही त्या चर्चा सुरूच आहेत. या सर्व चर्चा बाजूला ठेवून गडकरींनी विजयी होतील हा बहुतेक सर्व नागपूरकरांना नव्हे देशभरातील गडकरी समर्थकांना विश्वास आहे. तरीही जेव्हा देशातील सर्वोच्च शक्ती असलेल्या व्यक्ती अशा प्रकारे गडकरींना पाडण्यासाठी पुढे येत आहेत, असा दिवास्वप्नातला भास संजय राऊत यांना होतो, म्हणजेच गडकरी हे पंतप्रधान पदाचे मटेरियल आहेत हे अधोरेखित होते.
नितीन जयराम गडकरी हे आज २७ मे २०२४ रोजी वयाची ६७ वर्ष पूर्ण करून ६८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गडकरींचा जन्म नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाडा या गावचा. गडकरी परिवार हा तिथला मालगुजार परिवार होता. तीन बहिणी आणि एकच भाऊ अशा परिवारात मोठे होत असतानाच नितीन गडकरींचे पितृछत्र हरपले. त्यांच्या आई भानुताई गडकरी यांनी मुलांना सोबत घेऊन नागपूर गाठले आणि तिथेच मुलांचे शिक्षण केले. नितीन गडकरींचे शिक्षण नागपूरचे डी डी नगर विद्यालय नंतर जी एस कॉमर्स कॉलेज येथे झाले. बालवयापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्या काळात असलेल्या जनसंघाच्या युवा शाखेची जबाबदारी महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी उचलली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही ते खांदे कार्यकर्ते होते आणिबाणीत त्यांनी बाहेर राहून रात्री भिंती रंगवणे, सत्याग्रहींना मदत करणे, मिसा बंदींच्या घरी जाऊन मदत करणे अशी अनेक कामे केली होती.
१९७७ मध्ये आणिबाणी उठल्यावर नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नितीन गडकरींनी लढवली. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस पक्षाची युवा शाखा असलेल्या एन एस यु आय चे नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांनी गडकरींचा दोन मतांनी पराभव केला होता. जिचकारांना ९१ मते मिळाली तर गडकरींना ८९ मते मिळाली होती. तेव्हापासूनच गडकरी सामाजिक कार्यात सक्रिय झाले.
हा काळ जनता पक्षाचा होता. त्यावेळी जनता युवा मोर्चाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. १९८० मध्ये जनता पक्ष फुटला आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. संघ स्वयंसेवक असलेले गडकरी साहजिकच भारतीय जनता पक्षासोबत राहिले. तेव्हापासून ते पूर्णवेळ भाजपचे काम करत होते. नाही म्हणायला घरची शेती आणि लोखंडी फर्निचर बनवणे आणि विकणे हा त्यांचा व्यवसाय भागीदारीत सुरू होता.
दांडगा अभ्यास आणि उत्तम वक्तृत्व या जोरावर अगदी लहान वयातच त्यांनी पक्षात आपले स्थान बनवले होते. त्यामुळे १९८५ साली त्यांना भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यावेळी नितीन गडकरी जेमतेम २८ वर्षाचे होते. या निवडणुकीत काँग्रेसचे गेव आवारी यांनी नितीनजींचा पराभव केला. पराभवाने खचून न जाता नितीनजींचे काम पुढे सुरूच राहिले.
त्या काळात नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाची जागा ही भाजपकडे होती. त्या जागी भाजपचे गंगाधरराव फडणवीस (आजच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील) हे विजयी व्हायचे. १९८८ साली गंगाधररावांचे कर्करोगाने निधन झाले. त्या रिक्त जागी कोणाला उमेदवारी द्यायची यावर पक्षात खल सुरू झाला
तेव्हा नितीनजींचे नाव पुढे आले. १९८९ मध्ये झालेल्या या निवडणुकीत नीतीनजी दणदणीत बहुमताने विजयी झाले. इथून त्यांच्या राजकीय जडणघडणीला खरी गती मिळाली. त्यावेळी विदर्भात भाजपचे नेतृत्व करण्यासाठी कोणतेही नाव भाजपकडे नव्हते. परिणामी विदर्भाचे नेतृत्व करण्याची संधी नितीनजींकडे चालून आली.
हा कार्यकाळ जेमतेम सव्वा वर्षाचा होता. मात्र नंतर १९९० मध्ये ते पुन्हा विजयी झाले. या कालखंडात विधान परिषदेत आपल्या अभ्यासू शैलीने त्यांनी विरोधी पक्षातील एक आघाडीचा नेता म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. १९९५ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार जाऊन शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. या सरकारमध्ये नितीन गडकरींना सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून संधी मिळाली. नितीनजींनी या संधीचे अक्षरशः सोने केले. सरकार जवळ पैसा नसतानाही खाजगीकरणातून प्रकल्प उभे करता येऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ही त्यांच्याच कल्पक डोक्यातून निघालेली शक्कल होती. आज मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्याच काळात त्यांनी मुंबईतल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले. महाराष्ट्रभरात सर्वत्र पक्क्या रस्त्यांचे जाळे उभे केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत १९९८-९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी याच संदर्भातील राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी ही गडकरींना दिली होती.
१९९९ मध्ये महाराष्ट्रातील युतीची सत्ता गेली. त्यावेळी गडकरी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते बनले. त्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. या दोघांनाही आपल्या धडाकेबाज शैलीने गडकरींनी जेरीस आणले होते.
२००४ मध्ये गडकरी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले. २००७ मध्ये पुन्हा ते अध्यक्ष निवडले गेले. २००९ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची मुदत संपत होती. त्यांच्या जागी नवे नाव कोणाचे यावर देशभर चर्चा सुरू होती. अचानक नितीन गडकरी यांचे नाव पुढे आले. तसा विचार केला तर त्या काळात मनोहर पर्रीकर, शिवराज सिंह चव्हाण, राजनाथ सिंह, गोपीनाथ मुंडे, अशी नावे घेतली जात होती. मात्र अचानक गडकरींचे नाव समोर आले, आणि डिसेंबर २००९ मध्ये गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. देशातील सत्तेचा दावेदार असलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची त्यांना ही संधी मिळाली होती. सत्तेचा दावेदार असलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणारे ते पहिले नागपूरकर होते. तेव्हापासूनच देशाचे भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे बघितले जाऊ लागले.
२०१२ मध्ये गडकरी भाजपचे दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष झाले खरे, मात्र त्यांच्या विरोधात देशातीलच एक लॉबी सक्रिय झाली होती. त्यामुळेच फेब्रुवारी २०१३ मध्ये त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र खचून न जाता गडकरींनी काम पुढे सुरू ठेवले. परिणामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच प्रचंड बहुमताने विजयी झाले. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून संधी मिळाली. त्या संधीचे देखील त्यांनी सोने केले. परिणामी २०१९ नंतरही ते केंद्रात मंत्री राहिलेले आहेत.
गडकरी हे मुळातच संघ स्वयंसेवक, त्यामुळे थोडे राजकारण आणि जास्त समाजकारण अशी त्यांची जडणघडण झाली आहे. त्यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतो हे बघून शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा विडा उचलला. त्यातून पुर्ती उद्योग समूह उभा झाला. आज शेतीतील वाया जाणाऱ्या काडी कचऱ्यापासून इथेनॉल निर्मिती त्यांनी सुरू केली. इतरही अनेक प्रयोग सुरू केले. नागपुरात ऍग्रो व्हिजन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान कसे शिकवता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे एक सामाजिक भान आणि जाण असलेला नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
गडकरी हे कट्टर हिंदुत्वनिष्ठ असले तरी सर्व पक्षातील सर्व नेत्यांची त्यांचे कायम स्नेहपूर्ण संबंध राहिलेले आहेत. याचा अनुभव ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या मुलांचे झालेले विवाह आणि मंत्री असताना मुलीचा झालेला विवाह या प्रसंगातून नागपूरकरांना आलेला आहे. आज सर्वच स्तरात स्नेहपूर्ण संबंध असल्यामुळे सर्वांना गडकरी चालतात अशी परिस्थिती आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहिला आहे. त्यामुळेच येत्या ४ जूनला काही राजकीय अभ्यासकांचे अंदाज चुकुन मारुन खरे ठरले आणि चुकून माकून भाजपाला थोड्या कमी जागा मिळाल्या, तर इतर काही पक्षांशी जुळवून घेऊन सत्ता भाजपकडेच आणण्यासाठी गडकरी उपयुक्त ठरू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषक कधीपासून बांधत आहेत. अनेकांच्या मते यावेळी तशी वेळ येईल आणि गडकरींना पंतप्रधानपद स्वीकारावे लागेल.
गडकरी पंतप्रधान होतील किंवा नाही याचे उत्तर काळच देईल. मात्र ते पंतप्रधान झाले तरी, किंवा न झाले तरी, ते कायम आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने देशसेवा करत राहणार आहेत. त्यांचे हे कार्य अविरत सुरू राहणार आहे. हे कार्य सर्वांना सोबत घेऊन ते करणार आहेत हे नक्की. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले नितीन जयराम गडकरी आज २७ मे रोजी वयाची ६७ वर्ष पूर्ण करून ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. परमेश्वराने त्यांना उत्तम आरोग्य देऊन उदंड आयुष्य द्यावे आणि त्यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर देशसेवा घडावी यासाठी बित्तंबातमी परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा.