48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा?
मुंबई : लोकसभेसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होऊनही मतदारांना मतदान पेटीपर्यंत घेऊन जाण्यात सर्वच पक्ष अपयशी ठरले आहेत. राज्यातील ४८ पैकी तब्बल २१ मतदार संघात मतदानाचा टक्का घसरला आहे. या घसरलेल्या मतदानाच्या टक्क्याचा फटका कुणाला बसतो याबाबत सर्वच पक्षात धाकधूक वाढली आहे.
त्यातच महाराष्ट्रात रायगड हा एकमेव मतदार संघ आहे जेथे पुरुषांपेक्षा महिलांना जास्त मतदान केले आहे. येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिवसेना राष्ट्रवादी गटाचे अनंत गीते आमनेसामने आहेत. त्यामुळे या मतदार संघाच्या निकालाकडेही सगळ्यांचे लक्ष असेल.
राज्यात यंदा पक्षांची संख्या वाढली, मात्र राज्यातील काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तुलना केली, तर राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी २७ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहीशी वाढलेली दिसते. तर २१ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या घसरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे ज्या 21 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे, त्यामध्ये एकतर दुभंगलेले पक्ष समोरासमोर होते, किंवा एक पक्ष तरी फुटलेला पक्ष होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १५ मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यापैकी ८ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५ मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यापैकी ४ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २३ मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यापैकी १० मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १० मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यापैकी ४ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. भाजपनं २८ मतदार संघात निवडणूक लढवली, त्यापैकी १९ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे, तर ९ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहीशी कमी झाली आहे.
काँग्रेसने १७ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली, काँग्रेस लढवत असलेल्या १० मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे, तर फक्त ७ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.