सिडकोकडून भूखंड हस्तांतरास विलंब; आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली
पनवेल ः पनवेल महापालिकेकडून नवीन पनवेल नोड-आसूडगाव हद्दीमध्ये साडेचारशे खाटांचे माता-बाल संगोपन केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केली आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे रुग्णालयाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सिडकोकडून भूखंड हस्तांतरास विलंब झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याचे बोलले जात आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय वगळता इतर शासकीय रुग्णालय नाही. परिसरात सद्यःस्थितीत सुमारे आठ लाख लोकवस्ती असून दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती केंद्र अपुरे पडत असल्याने अनेक गर्भवतींना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागते.
खांदा वसाहतीलगत आसूडगाव सेक्टर १८ मध्ये भूखंड क्रमांक ८अ आणि ८ ब येथे आठ हजार चौरस मीटरचा भूखंड जिल्हा रुग्णालयासाठी सिडकोने राखीव ठेवला आहे. येथे पनवेल महापालिकेने १०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्र करण्याबाबतचा प्रस्ताव संमत केला होता. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीमध्ये या ठरावाला तीन वर्षांपूर्वी मंजुरीही देण्यात आली. हा प्रस्ताव आरोग्य संचालनालयाला पाठवण्यात आला होता, त्यानंतर त्या काही सुधारणा करण्यात आल्या. रुग्णालयांच्या खाटांमध्ये आणखी ३५० खाटांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार बांधकाम आराखडाही बदलण्यात आला आहे. अतिशय भव्य स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या केंद्रात विविध सोयी-सुविधा प्रस्तावित आहेत. हिरकणी या नावाने हा वैद्यकीय उपक्रम साकारला जाणार आहे.
गतवर्षी अर्थसंकल्पात प्रशासनाने आरोग्यावर विशेष भर देत माता बाल संगोपन केंद्रासाठी निधीची तरतूदही केली होती. मात्र पनवेल महापालिकेला सिडकोने वेळेत भूखंड हस्तांतरित केला नाही. त्यामुळे हा आरोग्य आणि वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडे जागा वर्ग करण्यात आली आहे. मात्र सध्या आचारसंहित लागू असल्याने याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.
