विशेष
श्याम ठाणेदार
मागील आठवडा हा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी घातक ठरला कारण या आठवड्यात एका पाठोपाठ एक अशा अनेक दुर्घटना घडल्या आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यात अनधिकृत उभा केलेला एक अजस्त्र होर्डींग कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांना जीव गमवावा लागला होता तर ६५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले. घाटकोपर मधील दुर्घटना घडण्याच्या काही तासानंतरच पुण्यात एक दुर्घटना घडली. पुण्यातील कल्याणीनगर येथे एका बड्या बापाच्या बिघडलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत पोर्षे नामक अत्याधुनिक मोटार रस्त्यावरून चालवत तरुण तरुणीचा अंगावर घातली आणि त्यांना बेदरकारपणे चिरडले. आपल्या या बिघडलेल्या पोराचे पाप झाकण्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी बिल्डर असलेल्या त्याच्या बापाने मग पैशाच्या जोरावर संपूर्ण यंत्रणा वाकवली मात्र सजग नागरिक आणि सोशल मीडियामुळे या बड्या बापाला आपल्या बिघडलेल्या पोराच्या कुकृत्यावर पडदा टाकता आला नाही. आज तो बिल्डर त्याचा बाप आणि त्याचा बिघडलेला पोरगा तिघेही गजाआड आहेत. या प्रकरणामुळे व्यवस्थेचे लक्तरे देखील वेशीवर टांगले गेले. पुण्यातील या दुर्घटनेची चर्चा चालू असतानाच डोंबिवलीतील निवासी क्षेत्रामध्ये एका केमिकल कंपनीला आग लागली आणि त्यात अनेक जणांचा होरपळून अंत झाला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर उजणी धरणात बोट उलटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण बुडाल्याने संपूर्ण कुटुंबाला जलसमाधी मिळाली, अहमदनगर मधील एका ओढ्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलातील जवानांच्या बोटीलाही अपघात झाला आणि त्यात त्यांचीही बोट बुडाली त्या अपघाततही काही जवान आणि स्थानिक नागरिकाला जलसमाधी मिळाली. महाराष्ट्रात या दुर्घटना घडत असतानाच शेजारील गुजरात मधील राजकोट येथून बातमी आली की तेथील एका गेमिंग झोनला आग लागून त्यात ३२ पेक्षा अधिक जणांचा जीव गेला ज्यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. देशाच्या आर्थिक राजधानी पासून सुरू झालेली दुर्घटणांची मालिका देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहचली. दिल्लीतील एका लहान मुलांच्या रुग्णालयाला आग लागून त्यात सहा नवजात अर्भकांचा बळी गेला. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या दूर्घटनांनी देश हादरून गेला देशात घडणाऱ्या या दुर्घटना चिंताजनक आहेत. वरकरणी या दुर्घटना निसर्गनिर्मित वाटत असल्या तरी या दुर्घटना मानवनिर्मित आहेत आणि यात बळी गेलेले सर्व निष्पाप नागरिक हे निष्काळजीपणा आणि बेपर्वाई चे बळी आहेत. प्रत्येक दुर्घटणांचा सखोल अभ्यास केला तर लक्षात येते की या सर्व दुर्घटना मानवी चुका किंवा निष्काळजीपणा मुळेच झाल्या आहेत. घाटकोपर मधील होर्डींग दुर्घटना असो की कल्याणीनगरमधील घटना असो या दोन्ही घटना या भ्रष्ट, सुस्त व्यवस्थेमुळेच घडल्या आहेत या दोन्ही घटनांमधील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. बोट उलटून झालेल्या दुर्घटना या निष्काळजीणामुळे झाल्या आहेत. डोंबिवली, राजकोट आणि दिल्लीतील आग दुर्घटना मानवी चुकांमुळे आणि व्यवस्थेच्या बेपर्वाईमुळे घडल्या आहेत. सुस्त, भ्रष्ट व्यवस्था आणि नागरिकांची चूक बेपर्वाई आणि निष्काळजीणामुळे घडणाऱ्या या दुर्घटना आपल्याला परवडणाऱ्या नाहीत. अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी ठोस राष्ट्रीय धोरण अवलंबावे लागेल.