

महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात ओळख मिळाली”- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात ओळख मिळाली, असं वादग्रस्त विधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. मोदींच्या या अजब विधानावर विरोधकांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे.
मोदी यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले की, “महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” असं मोदी म्हणाले.
दरम्यान मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवणारे व्टिट राहूल गांधीने केले आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर मेसेज पोस्ट करून म्हटले आहे की, “महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी केवळ एंटायर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यालाच चित्रपट बघावे लागतील”, असा टोला त्यांनी लगावला. मोदींनी आपण एंटायर पोलिटकल सायन्सची पदवी घेतल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा खोटा असून मोदींची डिग्री बोगस असल्याचा विरोधकांचे म्हणणे आहे. आज राहुल गांधीनी हाच धागा पकडत मोदींवर टिका केली.
राहुल गांधी यांच्यााशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनीही या विधानावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. श्रीनिवास बीव्ही यांनी जगभरातील वृत्तप्रत्राचे फोटो शेअर करत मोदींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर “ज्यांचे वैचारिक पूर्वज नथुराम गोडसेसह महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी होते, ते बापूंनी दिलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जून खरगे यांनी दिली आहे.
