ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना सक्तीची रजा
मुंबई : पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी महाराष्ट्र शासनाने ससून रुग्णालयातील गैरप्रकाराबाबत नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालानुसार ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे तर, पोलिसांच्या अटकेत असलेले न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहे.
पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नुमन्यामध्ये फेरफार झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे.जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजी नगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांची समिती गठीत केली होती. या समितीने बुधवारी दुपारी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला. या अहवालात ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई करत वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांचे निलंबन केले आहे. तसेच निलंबन असेपर्यंत त्यांचा निर्वाह भत्ता आणि पूरक भत्ते देय असणार आहेत. मात्र या कालावधीत त्यांना खासगी नोगरी किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करता येणार नाही. असे केल्यास ते गैरवर्तन समजून निर्वाह भत्ता मिळण्यास ते अपात्र ठरतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
