मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून अवमानप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी सामना दैनिकात रोखठोक या सदरात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले होते. “नितीन गडकरी यांच्या प्रचारात फडणवीस नाईलाजाने उतरले, एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटले, तसेच अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी शिंदे यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले”, असे अनेक आरोप आणि दावे संजय राऊत यांनी आपल्या सदरात केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावतीने त्यांच्या विधी सल्लागारांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजवाली आहे. तसेच तीन दिवसांच्या आत माध्यमांसमोर बिनशर्त माफी मागावी, असे या नोटीशीद्वारे सांगण्यात आले आहे. अन्यथा संजय राऊत आणि दैनिकाला फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
