विशेष
योगेश त्रिवेदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा दिवसांत तब्बल पाच विभूतींना भारतरत्न किताब जाहीर करुन इतिहासात अनोखा विक्रम नोंदविला आहे. आधी समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर मग माजी उपपंतप्रधान आणि सोमनाथ अयोध्या रथ यात्रेचे प्रणेते लालकृष्ण आडवाणी आणि नंतर दोन माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि पामलू वेंकट नरसिंह राव तसेच थोर कृषितज्ज्ञ डॉ. मोणकोंबू सांबशिवन (एम. एस.) स्वामिनाथन ! महत्वाची बाब म्हणजे राजीव गांधी हे पंतप्रधान असतांना त्यांनी अयोध्येतील श्रीरामलल्लाचे दर्शन खुले केले. पी. व्ही नरसिंह राव हे एकाच पक्षाच्या राजवटीचे कर्णधार असल्याने ते कोणताही निर्णय घेण्यास सक्षम, समर्थ होते. चौदा भाषा अवगत असलेले प्रकांड पंडित असे नरसिंह राव यांना श्रीराममंदिर उभारायची प्रबळ इच्छा होती आणि त्यासाठी अयोध्येतील विवादास्पद ढाॅंचा उद्ध्वस्त होणे आवश्यक होते. लाखो कारसेवक अयोध्येकडे कूच करते झाले होते. त्यामुळे विवादास्पद ढाॅंचा उद्ध्वस्त होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेषा होती. नरसिंह राव पंतप्रधान आणि कल्याणसिंह मुख्यमंत्री असे जबरदस्त राजकीय गणित जमले होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी हे २२ पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे कर्णधार असल्याने किमान समान कार्यक्रम यावर राज्यशकट हाकीत होते. त्यामुळे श्री राममंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा हे प्रश्न ते इच्छा असूनही सोडवू शकत नव्हते. त्यामुळे हिंदुस्थानचे विधिलिखित होते तशा घटना घडल्या. कोणताही निर्णय घेतला नाही म्हणजे तोही महत्वाचा निर्णय असतो. मौनं सर्वार्थ साधनम् ! असा न्याय नरसिंह राव यांचा म्हणावा लागेल. रविवार, ६ डिसेंबर १९९२ ! नवी दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी भारताचे पंतप्रधान पामलू वेंकट नरसिंहराव हे सकाळी सात वाजताच उठून आपला प्रातर्विधी उरकून कामाला लागतात. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम. त्यादिवशी रविवार असल्याने थोड्या उशिरा उठले असावेत. त्यांचे व्यक्तिगत वैद्यकीय अधिकारी डॉ. के. श्रीनाथ रेड्डी हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणी साठी रक्त आणि लघवी चे नमुने घेतले. रक्तदाब तपासला आणि तेथून निघाले. घरी जाऊन डॉ. रेड्डी यांनी बातम्या ऐकल्यावर ते एकदम अस्वस्थ झाले. तत्काळ त्यांनी पंतप्रधान नरसिंहराव यांचे घर गाठले. अचानक परतलेल्या डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांना पाहून पंतप्रधान संतापले. काय झाले ? परत कां आलात ? प्रश्नांची सरबत्ती केली. डॉ. रेड्डी यांनी राव यांना शांत केले. त्यांचा रक्तदाब वाढला होता. रागाने ते लालबुंद झाले होते. दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी बाबरी मशिदीच्या तीन घुमटांपैकी एक हजारोंच्या संख्येने आलेल्या रामभक्तांनी धराशायी केला होता. नरसिंहराव यांचे एक सहकारी माखनलाल फोतेदार यांनी नरसिंहराव यांना फोन करुन या रामभक्तांवर अश्रूधुर सोडण्याचा सल्ला दिला. ‘काय ? मी असं करु शकतो ?’ असा एकदम निरागस सवाल पंतप्रधान नरसिंहराव यांनी फोतेदार यांना केला. बाबरीचा किमान एखादा घुमट आपण वाचवून आणि तो काचेच्या घरात ठेवून काँग्रेसने बाबरी वाचवण्यासाठी प्रयत्न केला आहे असे तरी दाखविता येईल, असे माखनलाल फोतेदार यांनी नरसिंहराव यांना काकुळतीच्या स्वरात सांगितले. नरसिंहराव हे प्रकांडपंडित होते. त्यांना सुमारे चौदा भाषा अवगत होत्या. माखनलाल फोतेदार यांच्या या दाव्याची संपूर्ण माहिती फोतेदार यांच्या ‘दि चिनार लिव्ज’ या आत्मचरित्रात आहे. पण ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की, बाबरी मशीद पडली त्या संपूर्ण कालावधीत नरसिंहराव हे देवपूजा करीत होते. बाबरीच्या पाडण्याच्या सुरुवातीला नरसिंहराव जे पूजेला बसले ते बाबरी धराशायी होईपर्यंत ते पूजाच करीत होते. ज्यावेळी त्यांना सांगण्यात आले की बाबरी संपूर्ण पाडली गेली आहे, तेंव्हा नरसिंहराव यांनी आपली पूजा संपविली. ही बाब कुलदीप नायर यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांच्या कानावर घातली. अर्जुनसिंह या नरसिंहराव यांच्या सहकारी मंत्र्यांनी सुद्धा या बाबीचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली तेंव्हा सी. के. जाफर शरीफ हे संतापले आणि याची किंमत काँग्रेस पक्षाला मोजावी लागेल, असा इशाराही दिला होता. संपूर्ण बैठकीत नरसिंहराव हे अगदी शांतपणे बसले होते. माखनलाल फोतेदार हे या बैठकीत ढसाढसा रडल्याचेही सांगण्यात येते. नरसिंहराव यांना राममंदिर बांधायचे होते आणि त्यांनी ‘रामालय’ची स्थापना केल्याचे ही सांगण्यात येते. ही संपूर्ण नोंद गुजराती पत्रकार आणि अभिनेत्री जिग्ना नारायणभाई त्रिवेदी यांनी गुजरात मित्र लाईव्ह च्या एका खास वृत्तांतामध्ये नमूद केली आहे, हा वृत्तांत ऐकायला मिळाला. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय यशवंतराव चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नझीर या पाच न्यायमूर्तींनी एकमताने अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी संदर्भात महत्वपूर्ण निकाल दिला आणि पाच एकर जमीन मुस्लिम समाजाला मशीद उभारणीसाठी देण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला. शेकडो वर्षे चाललेल्या वादाची ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी पूर्णाहुती झाली. हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल. अटलबिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी चे नेते म्हणून भारताचे पंतप्रधान असतांना अयोध्येतील राममंदिर, धारा ३७०, समान नागरी कायदा हे महत्त्वाचे मुद्दे भारतीय जनता पक्षाने किमान समान कार्यक्रम आधारित सरकार चालविण्यासाठी बाजूला ठेवून कामकाज केले. परंतु नरेंद्र दामोदरदास मोदी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यावर २०१४ मध्ये ५४३ पैकी २८२ आणि २०१९ मध्ये मध्ये तब्बल ३०३ असे सुस्पष्ट बहुमत घेऊन केंद्रात सत्तेवर आल्यानंतर वाजपेयी यांच्या काळात बाजूला सारलेले महत्त्वाचे तीनही मुद्दे मार्गी लागायला सुरुवात झाली. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे घेऊन काही दिवसातच ३७० चा प्रश्न निकाली काढला आणि अमित शाह यांना भारतीय जनता पक्षाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नंतरच्या पोलादी पुरुषाची उपमा दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या निर्णयाचे जाहीरपणे स्वागत केले. राममंदिर प्रश्नांची सोडवणूक मार्गी लागली आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समान नागरी कायदा आणण्यासाठी ‘समय आ गया हैं’ असे ठणकावून सांगत सूतोवाच केले. सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमि प्रकरण असतांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची संयुक्त बैठक बोलावून श्री रामजन्मभूमि मंदिराचा प्रश्न सोडवा, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला होता. तो त्यांनी मानला नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक अभूतपूर्व असा निर्णय दिला. हे श्रेय सर्वस्वी सर्वोच्च न्यायालयाचेच आहे. याचा मतांच्या राजकारणासाठी वापर सुरु झाला आहे. जनता सूज्ञ आहे. पामलू वेंकट नरसिंह राव यांना भारतरत्न किताब जाहीर करुन नरेंद्र मोदी यांनी रामजन्मभूमि चळवळीतील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची बूज राखली असेच म्हणावे लागेल. या प्रकारे कितीही बोटे मोडली तरी कॉंग्रेस पक्षाचे योगदान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे, असे म्हटले तर ते अनाठायी ठरणार नाही. चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न किताब जाहीर करुन नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती चळवळीतील योगदान अधोरेखित केले आहे. आता राहता राहिला प्रश्न तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताब जाहीर करण्याचा. तोही जाहीर करुन नरेंद्र मोदी यांनी एक वर्तुळ पूर्ण करावे, अशी तमाम राष्ट्रप्रेमी जनतेची मागणी आहे. ही मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच केली आहे. असे केल्याने हिंदुहृदयसम्राटांच्या आत्म्याला निश्चितपणे आनंद मिळेल, हे निःसंशय ! नरसिंहराव यांच्या आत्म्याला सुद्धा नक्कीच शांती लाभेल. जय श्रीराम