अशोक गायकवाड
रायगड : मुंबई गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट) अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्चित कराव्यात; त्यासाठी संबंधित महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,अधीक्षक अभियंता, रायगड सा.बां.मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई श्रीमती सुषमा गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जगदीश सुखदेवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदी उपस्थित होते.
या बैठकीत रायगड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील ब्लॅक स्पॉट व अपघातप्रवण क्षेत्र ची अद्ययावत यादी व त्याचे स्थान संबंधित विभागाला अवगत केल्याबाबतचा आणि अस्तित्वातील अरुंद रस्त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी बृहत आराखडा तयार करणेबाबतचा आढावा घेण्यात आला. तसेच द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेकरीता पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधा व साधनसामुग्री याबाबतचा आढावा व ‘ब्लॅक स्पॉट’ बाबतची माहिती देण्यात आली. साखळी क्रमांक ०/०० ते ८४/०० या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत पळस्पे ते इंदापूर या रस्त्यावरील ‘ब्लॅक स्पॉट’ बाबतची माहिती व अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून ठोस केलेल्या कार्यवाहीबाबतचे समितीपुढे सादरीकरण व अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. साखळी क्रमांक ८४/०० ते १५४/३०० या मार्गावरील अपघात कमी करण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केलेल्या ठोस उपाययोजना याबाबतचे सादरीकरण व ‘ ब्लॅक स्पॉट’ बाबतची माहिती देण्यात आली. बैठकीत ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गावर सर्वाधिक अपघात होतात अशी माहिती यावेळी देण्यात आली. एकात्मिक रस्ते अपघात माहिती प्रणाली अर्थात ‘आयरॅड’ वरील अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करुन अपघातांची कारणे व त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. अपघात रोखण्यासाठी संबंधित ठिकाणी करावयाच्या लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित कराव्यात. आवश्यक तेथे वेग नियंत्रणासाठी रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग्ज, सूचना फलक, रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी उपाय योजण्यात यावेत. यासाठी ब्लॅकस्पॉट निहाय संयुक्त सर्वेक्षण करुन उपाययोजना सुचविण्यात याव्यात. सर्वेक्षणासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे, असेही जावळे म्हणाले अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या परिसरात ‘१०८- रुग्णवाहिका सेवेतील रुग्णवाहिकांची स्थायी थांब्याची ठिकाणे ठरविणे, रुग्णालयात लवकरात लवकर अपघातग्रस्तांना पोहोचविण्याच्यादृष्टीने आपत्कालीन वाहतूक आराखडे तयार करणे यादृष्टीने कार्यवाही करावी, आदी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या.