सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने ठाकुर्ली रहिवासी हैराण

कल्याण : ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील गृहसंंकुलांमध्ये मागील तीन महिन्यांंपासून महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. आतातर उन्हाची काहिली, घामाच्या धारांनी नागरिक हैराण आहेत. अशा परिस्थितीत ९० फुटी रस्ता भागात पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद राहत असल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.

९० फुटी रस्ता परिसरात मध्यमवर्गियांची सर्वाधिक वस्ती आहे. या भागातील अनेक नोकरदार घरातून कार्यालयीन काम करतात. काही जण विदेशातील आपल्या कार्यालयातील कामकाज घरबसल्या करतात. या सर्वांंना या खंडित वीज पुरवठ्याचा सर्वाधिक त्रास होतो.

ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम, सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने रहिवासी हैराण

अनेक घरांंमध्ये बिछान्याला खिळून असलेले वृध्द, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळे आहेत. वीज गेली की या मंडळींना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते. ९० फुटी रस्ता भागातील सततच्या वीज लपंडावाची समस्या कायमची मिटविण्यासाठी या भागासाठी स्वतंंत्र वीज पुरवठा यंत्रणा बसवावी, अशी मागणी खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता भागातील रहिवाशांकडून केली जात आहे.

बुधवारी सकाळी दहा वाजता गेलेली वीज दुपारी चार वाजले तरी आली नव्हती. तोपर्यंत रहिवासी घरात बटाट्यासारखे उकडून निघाले होते. अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन या सततच्या वीज लपंडावाबद्दल जाब विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून सुरू आहेत. त्यांनाही या खेळखंडोब्याचा फटका बसत आहे.

महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, एमएमआरडीएकडून ठाकुर्ली भागात रस्ते काम सुरू आहे. त्यांनी काम करताना जेसीबीच्या साहाय्याने महावितरणची महत्वाची वीज पुरवठा करणारी भूमिगत वाहिनी खराब केली. त्यामुळे अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकारी, ठेकेदारांनी तात्काळ महावितरणला देणे आवश्यक होेते. पण, एमएमआऱडीए अधिकाऱ्यांनी ही माहिती महावितरणला न देता याविषयी गुपचिळी धरून राहणे पसंंत केले.

खंंबाळपाडा भागातील वीज पुरवठा खंंडित झाल्याच्या तक्रारी महावितरण कार्यालयात आल्या. त्यावेळी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेऊनही खंडित वीज पुरवठ्याचा तपास लागत नव्हता. अखेर रस्ते खोदकाम करताना झालेल्या बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरण अधिकाऱ्यांना समजले. एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महावितरणला मनस्ताप आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला दंड ठोठावण्याच्या हालचाली केल्या. जोपर्यंत एमएमआरडीए दंड भरत नाही, तोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न करण्याची भूमिका महावितरण अधिकाऱ्यांनी घेतली. या कलगीतुऱ्यात नागरिकांची घुसमट झाली. अखेर सामोपचाराने हा विषय मिटवून खंबाळापाडा भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

खंबाळापाडा भागातील एका सोसायटीत तांत्रिक बिघाड झाला होता. तो बिघाड काढताना एमएमआरडीएकडून रस्ते काम करताना जेबीसीकडून महावितरणची वीज वाहिनी खराब झाल्याचे निदर्शनास आले. तो बिघाड दुरुस्त करून या भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. – चंदन मोरे, साहाय्यक अभियंता, महावितरण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *