उद्धव ठाकरेंचा इशारा
सांगली : औरंगजेबाची वृत्ती तुम्हाला का म्हणायच नाही? औरंगजेबाने मराठ्यांबाबत लिहून ठेवलं होतं. पहाडीत राहणारे मरहट्टे तमाम दुनियेला भारी आहेत. वीरांचा शूरांचा हा इलाखा आहे. पहाडी मुलखात तमाम दुनियेला ते भारी आहेत. इथे पराक्रम शिकवावा लागत नाही. आज औरंगजेबाची वृत्ती शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडत आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा. आम्ही भाजपला सोडलं हिंदूत्व सोडलं नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे छत्रपतींनी शिकवलं नाही. महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही”, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. सांगली येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले
उद्धव ठाकरे म्हणाले, ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले असले तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. अजित पवारांना पक्षाचं चिन्ह वापरताना खाली सूचना द्यायला सांगण्यात आली आहे. सिगारेटच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा दिला जातो. तशाच प्रकारे अजित पवारांना न्यायालय निकाल देत नाही तोवर तसेच लिहावे लागणार आहे. भाजपची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली आहे.
शिवसेनेनं पेरलेल्या बियांचा आता वटवृक्ष झाला आहे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेनं पेरलेल्या बियांचा आता वटवृक्ष झाला आहे. भाजपच्या बियांना अंकुर देखील फुटला नाही. जो माणूस मातीत खेळतो तो मातीशी बेईमानी करत नाही. काही माणसं ओळखण्यात माझी चूक झाली. काय दिलं नव्हतं म्हणून खाऊन खाऊन पचन झालं नाही म्हणून पळून गेले. शिवसेना नसती तर हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची ओळख महाराष्ट्राला झाली असती का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
शिवसेनेने किंवा काँग्रेसने कधीही सुडाचे राजकारण केले नाही
आज या मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दम दिला आहे. तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. आता निवडणुकीनंतर कुंडली आणि पोपट घेऊन झाडाखाली बसण्याचे काम आहे. कोल्हापुरात जाऊन शाहू महाराज यांची भेट घेतली. तिथे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. शिवसेनेने किंवा काँग्रेसने कधीही सुडाचे राजकारण केले नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांवर टीका करायचे पण सुडाने वागले नाहीत, असंही ठाकरेंनी नमूद केलं.