कोची : लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराची मुदत गुरवारी सायंकाळी संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारी गाठले.
मोदी कन्याकुमारीमधील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनीही ध्यानधारणा केली होती.
मागच्या दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला होता, आज तो थंडावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा देत जोरदार प्रचार केला होता. आतापर्यंत त्यांनी २०६ सभा आणि रोड शो घेतले आहेत. तर ८० हून अधिक मुलाखती दिल्या आहेत. सायंकाळाचा सुर्योदय पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी ध्यानासाठी बसवे. १ जून रोजी दुपारी ३.३० वाजता ते कन्याकुमारीहून माघारी निघणार आहेत. मोदी येणार असल्यामुळे रॉक मेमोरियल परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पर्यटकांना याठिकाणी बंदी घालण्यात आली असून पुढचे दोन दिवस तब्बल २००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
२०१९ सालीही लोकसभेचा प्रचार संपल्यानंतर अशाचप्रकारे पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे ध्यानधारणेसाठी गेले होते. यावेळी १९ एप्रिल रोजी सुरू झालेला लोकसभेचा महासंग्राम १ जून संपत आहे. तर ४ जून रोजी मतदानाचा निकाल लागेल.
