उद्योजकांची एमआयडीसी अधिकऱ्यांकडे मागणी

डोंबिवली : डोंबिवलीतील सरसकट सर्व कंपन्यांचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) सुरू करण्यात आलेले सर्वेक्षण तात्काळ थांबवा. अमुदान कंपनी स्फोटाची दुर्घटना दुखदायकच आहे. या स्फोटानंतरची परिस्थिती सावरण्यासाठी आणि यापुढे अशी कोणतीही दुर्घटना घडणार नाही, याविषयी प्राधान्याने उद्योजकांबरोबर चर्चा करावी. त्यानंतर सर्वेक्षण, कंपन्या स्थलांतर या विषयांपर्यंत पोहाचावे, अशा मागण्या ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (कामा) शुक्रवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन केल्या.

अमुदान कंपनीतील स्फोटानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाने एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी, सर्वेक्षण सुरू केले आहे. या अचानक सुरू करण्यात आलेल्या प्रकाराने उद्योजक त्रस्त आहेत. कंपनी उत्पादन, त्याची पाठवणी, माल खरेदीदारांबरोबरच्या बैठका याविषयासाठी वेळ देण्याऐवजी डोंबिवलीतील उद्योजकांना अमुदान कंपनी स्फोटामुळे विविध तपास यंत्रणांना सामोरे जावे लागत आहे. शासन आदेशाप्रमाणे एमआयडीतील अतिधोकादायक, कंपन्या स्थलांतराच्या हालचाली प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केल्या आहेत. या प्रकाराने हवालदिल झालेल्या ‘कामा’ संघटनेच्या सदस्यांनी ‘कामा’चे अध्यक्ष राजू बेलारे, माजी अध्यक्ष अध्यक्ष देवेन सोनी यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीचे उपअभियंता राजेश मुळे यांची भेट घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता हर्षे, कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड उद्योजकांबरोबरच्या बैठकीला अनुपस्थित होते.

अमुदान कंपनी स्फोटाची दुर्घटना दुर्देवी आहे. अशा दुर्देवी घटना पुन्हा एमआयडीसी भागात घडू नयेत यासाठी सर्व उद्योजक आपल्या पध्दतीने काळजी घेतील. प्रत्येक जण आपल्या कंपनीत औद्योगिक सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यासाठी कटिबध्द आहे. बहुतांशी कंपन्यांमध्ये अशाप्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे सरसकट सर्वच कंपन्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांना स्थलांतरासाठी राजी करू नये. एमआयडीसीने गेल्या तीन दिवसात रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ज्या रासायनिक कंपनीत उत्पादन प्रक्रिया, कामगार सुरक्षा आणि उत्पादित माल, साठा केंद्रे, रासायनिक भांडार कक्ष याविषयी काही त्रृटी आढळल्या असतील तर त्या कंपनीच्या मालकांना एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम आहे त्या त्रृटींचे अनुपालन करण्यासाठी अवधी द्यावा. त्या अवधीत त्याने ते काम केले नाही. त्यांच्या कंपनीत काही दुर्घटना घडली तर त्या कंपनीचे स्थलांतर करण्यासाठीची प्रक्रिया जरूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी. कामा संघटनेचे सदस्यही या कामासाठी शासकीय यंत्रणांना सहकार्य करतील, असे आश्वासन अध्यक्ष राजू बेलूर यांनी एमआयडीसीला दिले आहे. एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला उद्योजकांकडून जे सहकार्य लागेल ते देण्याची आपली तयारी असेल असे आश्वासन कामाच्या सदस्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले.

डोंबिवली एमआयडीसीत सुरू असलेले सर्वेक्षण तात्काळ थांबविण्यात यावे. ज्या रासायनिक कंपन्यांमध्ये सर्वेक्षणाच्यावेळी त्रृटी आढळून आल्या आहेत. त्यांना एक वेळ सुधारण्याची संधी द्यावी. त्यानंतर काही दुर्घटना घडली तर या दोन्ही यंत्रणांनी संबंधित कंपनीबाबत योग्य निर्णय घ्यावा. त्याला ‘कामा’चे सहकार्य असेल असे आश्वासन एमआयडीसीला दिले आहे. -राजू बेलूर, अध्यक्ष, कामा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *