एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टिका
ठाणे: बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सवंगडी मानायचे. पण उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी असल्यासारखे वागवायचे. पण इथून पुढे हे खपवून घेतले जाणार नाही. अब राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. ते गुरुवारी ठाण्यात शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार, मंत्री, आमदार आणि इतर नेते उपस्थित होते. या सगळ्यांसमोर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभं राहा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका. शिवसैनिक फायरब्रँड आहे. मुख्यमंत्री 24*7 काम करतो. तुम्ही पण 24*7 काम करा, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित आमदार आणि खासदारांना दिला. आमदार म्हणून जेवढा लीड द्याल, ते तुमचं प्रगतीपुस्तक असेल. पुढचं तिकिट मिळेल की नाही हे त्यावरून ठरेल. आमदार, जिल्हाप्रमुखांची आणि पदाधिकाऱ्यांची ही खरी टेस्ट आहे, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. पक्षाची शिस्त कुणीही बिघडू नका, मी पण बिघडणार नाही. इथे राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. इथे कुणीही नोकर नाही, आपण सगळे मालक आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना सांगितले.
पण मेहुण्याला नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीला कोण गेलं होतं ?
ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांना त्यांच्या सततच्या दिल्लीवाऱ्यांवरुन लक्ष्य केले जाते. एकनाथ शिंदे यांना दिल्लीश्वरांपुढे झुकावे लागते, अशी टीकाही ठाकरे गटाकडून केली जाते. त्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. तुमच्या मेहुण्याला नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीला कोण गेलं होतं, असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. आपल्या कुटुंबावर संकट आलं की इकडे तिकडे पळणारे कधी कार्यकर्त्यांसाठी धावलेले दिसले नाहीत, असेही शिंदे यांनी म्हटले.
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका
एकनाथ शिंदे यांनी आजच्या कार्यक्रमात हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. इंडियाच्या सभेत उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी फक्त 5 मिनिटं मिळाली. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा उल्लेख केला नाही. हिंदूहृदयसम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागली आहे. पंतप्रधान मोदींनी कलम 370 रद्द करुन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदींना तुम्ही औरंगजेब म्हणता. औरंगजेबाने वडिलांना सोडलं नाही, भावाला सोडलं नाही. अशी वृत्ती असणारा औरंगजेब कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.