ठाणे : मासळी साठ्यांचे जतन तसेच मच्छिमारांच्या जिवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी 01 जून  ते 31 जुलै  (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) दिनेश पाटील यांनी दिली आहे.

पावसाळी कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळतो. त्यामुळे राज्याच्या सागरी जलाधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत) यांत्रिकी मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. या कालावधीत,

1) पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील.

2) पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.

3) समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि. 01 जून 2024 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि. 31 जुलै 2024 वा त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही.

4) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण / मार्गदर्शक सुचना/ आदेश लागु राहतील.

5) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.

6) पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.

7) बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिध्द आहे.

8) 1 जून 2024 पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना 1 जून 2024 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही. व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 अंतर्गत कार्यवाहीस पात्र राहतील. असे श्री. पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *