दहावीच्या निकालात मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील
असंख्य मुलींना प्रेरणा मिळावी – आयुक्त सौरभ राव
ठाणे : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ठाणे महापालिकेच्या शाळांमधून पहिले सहाही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. ठाणे महापालिका शाळांचा निकाल यंदा ८३.८४ टक्के लागला आहे. गतवर्षी ७०.५०टक्के निकाल लागला होता. २०२४मध्ये झालेल्या एसएससीच्या परीक्षेत ठाणे महापालिकेच्या चार माध्यमांच्या २२ शाळांमधून एकूण १२७७ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यापैकी ७१२ मुली तर ५६५ मुले उत्तीर्ण झाली. त्याचबरोबर, गुणानुक्रमे पहिले सहा क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. या विद्यार्थिनींच्या यशातून आणखी असंख्य मुलींना प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केली आहे.
खुशबू मेहबूब कुलदिया ही माध्यमिक शाळा क्रमांक १५, किसननगर, इंग्रजी माध्यमाची विद्यार्थीनी ९४ टक्के मिळवून प्रथम आली आहे.त्यापाठोपाठ, फैयाज सौदागर जेहजीब (माध्यमिक शाळा क्रमांक १४, मुंब्रा, इंग्रजी माध्यम) या विद्यार्थिनीला ९१.८० टक्के, तर, मानसी छगनलाल कुमावत (माध्यमिक शाळा क्रमांक १५, किसननगर, इंग्रजी माध्यम) हिला ९०.४० टक्के गुण मिळाले आहेत. रोमैशा मेहताब आलम (माध्यमिक शाळा क्रमांक १३, कौसा, उर्दू माध्यम) हिला ८९.८० टक्के, मुबीन अहमद कुरेशी (माध्यमिक शाळा क्रमांक ०८, राबोडी, उर्दू माध्यम) हिला ८९.६० टक्के गुण मिळाले आहेत. तर, श्रुती यशवंत खवळे (माध्यमिक शाळा क्रमांक ०१, किसननगर, मराठी माध्यम) हिला ८९.४० टक्के गुण मिळाले आहेत. या विद्यार्थिनींनी घेतलेली मेहनत, त्यांच्या शिक्षकांनी केलेले परिश्रम आणि पालकांची साथ यामुळे हे यश मिळवणे त्यांना शक्य झाले आहे. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचा ठाणे महापालिकेचा प्रयत्न आहे. या यशामुळे या विद्यार्थिनींबरोबरच, आमचे शिक्षक, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही आनंद झाला आहे. या विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी उत्तमोत्तम शुभेच्छा देतो, अशा भावना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच, या विद्यार्थिनींच्या यशातून आणखी असंख्य मुलींना प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षाही राव यांनी व्यक्त केली आहे.