माथेरान : माथेरान मध्ये २०२२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या त्यावेळी अनेक ठिकाणी ई रिक्षाच्या बाबतीत माहिती फलक नगरपरिषदेच्या माध्यमातून लावण्यात आले होते. परंतु कुणा अज्ञात व्यक्तींनी हे फलक आकसापोटी पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्या फलकावर असणारी शासकीय माहिती आणि ई रिक्षा बाबतीत नियमावली पर्यटकांना मिळत नाही.
लवकरच माथेरान मध्ये अधिकृतपणे एकूण वीस ई रिक्षा पुन्हा नव्या जोमाने हातरीक्षा चालक मालक स्वतः चालविणार असून त्याबाबत त्यांनी आवश्यक कागदपत्रे संघटनेच्या वतीने जमा केलेली आहेत.त्यानंतर उर्वरित एकूण ७४ हातरीक्षा मालकांना सुध्दा टप्प्याटप्प्याने ई रिक्षा मिळणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या या वीस ई रिक्षांना आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा संरक्षण असावे यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे नगरपरिषदेच्या माध्यमातून लावणे गरजेचे आहे. मागील काळात ज्याप्रमाणे नगरपरिषदेच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत त्याच धर्तीवर महत्वाच्या ठिकाणी जेथून ई रिक्षा धावणार आहेत त्या दस्तुरी नाक्यापासून कस्तुरबा रोड ,रिगल नाक्यापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत असे बोलले जात आहे.