विजय मांजरेकर -रमाकांत देसाई स्मृती लीग क्रिकेट स्पर्धा
मुंबईः शिवाजी पार्क जिमखान्याने विजय मांजरेकर आणि रमांकात देसाई या मान्यवर क्रिकेटपटूंच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत केलेल्या टी- २० स्पर्धेचे विजेतेपद पार्कोफीन क्रिकेट संघाने पटकावले . जिमखान्याच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पार्कोफीन संघाने डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमीचा सात खेळाडू राखून पराभव केला . या विजेतेपदासह पार्कोफीन संघाला चषक आणि एक लाख रूपयांचे पारितोषिकही मिळाले.
नाणेफेक जिंकून पार्कोफीन संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले . त्यांचा हा निर्णय गोलंदाजानी सार्थ ठरवला .विशाल दाभोळकर आणि हर्षल जाधवने भेदक गोलंदाजी करून डि वाय पाटील संघाचा डाव १९ . १ षटकांत १३२ धावांतच आटोपला .हितेय चौहानने २३ ,गौरव जठारनेही २३ आणि अभिग्यान कुंडूने ३३ धावा केल्या .विशाल दाभोळकरने २४ धावांत तीन आणि हर्षल जाधवने १५ धावांत दोन बळी घेतले .. विजयाचे लक्ष्य गाठताना डी वाय पाटील संघाकडून विजयी संघाला कडवा संघर्ष झाला नाही . केवळ तीन खेळाडूना गमावून पार्कोफीन संघाने १३ . ४ षटकांतच १३३ धावा करून विजेतेपद मिळवले . जितेश राऊतने २४ , तर सुवेद पारकरने एकाकी झुंज देत आठ चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने नाबाद ५३ धावा केल्या .श्रेजीत घरतने २० आणि प्रसाद पवारने २९ धावा केल्या.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अतिरीक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांचे हस्ते झाला . या प्रसंगी स्पर्धेचे प्रायोजक आस्पिट बुलीयनचे संचालक दर्शन देसाई , शिवाजी पार्क जिमखान्याचे सरचिटणीस संजीव खानोलकर , सहाय्यक चिटणीस सुनील रामचंद्रन आणि विश्वस्त अलका देसाई तसेच कार्याध्यक्ष दीपक मुरकर ,विश्वस्त नायक आणि क्रिकेट विभागाचे चिटणीस सुशांत मांजरेकर उपस्थित होते .
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक प्रसाद पवार , सर्वोत्तम फलंदाज श्रीराज घरत , सर्वोत्तम गोलंदाज विशाल दाभोळकर आणि अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू सुवेद पारकर ठरला . सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक योगेश ताकवलेला मिळाले.