ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत शुक्रवारी सकाळी मुंब्रा प्रभागात साफसफाई उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सफाई उपक्रमाची सुरूवात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत कौसा स्टेडियम, एम. एम. व्हॅली रोड येथून करण्यात आली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झालेल्या या मोहिमेची सुरूवात कौसा स्टेडियमसमोरील रस्ता स्वच्छ करण्यापासून झाली. या साफसफाईत, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (परिमंडळ १) मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड सहभागी झाले होते. त्यांच्यासह उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे हे अधिकारीही या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यानंतर, कौसा शिमला पार्क येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ३१चीही सफाई करण्यात आली. या शाळेची पाहणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.
मुंब्रा आणि कौसा परिसरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यांचा सफाई मोहिमेत समावेश करण्यात आला होता. या मोहिमेनंतर, मुंब्रा परिसरातील नाले सफाईच्या कामांचीही पाहणी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली. या भागात इतरांपेक्षा उशिराने काम सुरू झाले असून पाच जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश यापूर्वीच आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.