कल्याण : कल्याण लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याची मतमाेजणी डोंबिवली पूर्वेतील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. मतमोजणी केंद्रात एकूण ८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे.
लोकसभा मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबिर २८ मे रोजी डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात झाले. आता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण शिबिर ३ जूनला सकाळी ६ वाजता डोंबिवली पूर्वेतील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात ठेवण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रति विधानसभा मतदारसंघात १४ याप्रमाणे एकूण ८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे. मतदानाच्या एकूण २९ फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणी एकूण ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सुषमा सातपुते यांनी दिली.
