मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथे १ जून २०२४ रोजी महाराष्ट्रातील कॅरम खेळाडूंसाठी पहिले वातानुकूलित प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रात एकंदर ८ कॅरम बोर्ड मांडण्यात आले असून सायंकाळी ५ ते रात्रौ ९ दरम्यान हे केंद्र सराव व प्रशिक्षणासाठी खुले असणार आहे. महाराष्ट्रातील नोंदणीकृत खेळाडूंसाठी हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय व अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेपूर्वी  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरुष व महिला गटातील खेळाडूंचे शिबीर या केंद्रात आयोजित केले जाणार आहे. विशेष करून ज्युनिअर गटातील मुला मुलींना या प्रशिक्षण केंद्रात खेळाच्या प्रशिक्षणासोबतच नियमांची माहिती दिली जाणार आहे.

प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी कॉम्रेड वेणू नायर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गरजू खेळाडूंना या उपक्रमाचा विशेष फायदा व्हावा व महाराष्ट्रात अधिक गुणी खेळाडू तयार व्हावेत म्हणून या केंद्रासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिशनला स्पर्धा आयोजित करण्यासाठी संस्थेचा हॉल व इतर सहकार्य करण्याची ईच्छा व्यक्त केली. असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमासाठी कॉम्रेड वेणू नायर यांनी रुपये १ लाख देणगी जाहिर केली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने  मानद सचिव अरुण केदार यांनी नॅशनल मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर, युनियनचे सहाय्यक चिटणीस कॉम्रेड विनय सावंत तसेच इन्स्टिट्यूटचे सचिव कॉम्रेड चेतन सावल यांचे कॅरमचे घड्याळ भेट देऊन स्वागत केले. तसेच प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्धल आभार मानले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार उपस्थित होते. शिवाय अनेक कॅरम खेळाडूंनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला प्रतिसाद नोंदविला. अधिक  माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *