जुहू किनाऱ्यावर दुग्ध उद्योगाविरोधात निदर्शने
मालाड- जागतिक दूध दिनानिमित्त प्राण्यांच्या हक्कासाठी कार्यरत असलेल्या ‘युनायटेड फॉर कम्पॅशन इंटरनॅशनल फाऊंडेशन’कडून जुहू समुद्रकिनाऱ्यावर दुग्ध उद्योगांविरोधात निदर्शने करण्यात आली. मुक्या प्राण्यांचे शोषण थांबवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दुग्धशाळा मातृत्व नष्ट करते, प्राण्यांचे शोषण थांबवा, वासराला उपाशी मारणाऱ्यांविरोधात आम्ही लढू, असे फलक हातात घेऊन संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्त्या अवनी कारिया यांनी उपस्थितांशी संवाद साधला. दुग्धशाळांमधील अनपेक्षित पद्धतींबद्दल त्यांनी माहिती सांगितली. अधिकांश लोकांना दुग्धशाळांमध्ये होणाऱ्या मानक पद्धतींबद्दल माहीत नाही. गायी आणि म्हशींना कृत्रिम बीजरोपणाद्वारे गर्भवती केले जाते, तर वासरांना जन्मल्यानंतर लगेच त्यांच्यापासून दूर केले जाते. नर वासरांपासून दूध उत्पादन करता येत नसल्यामुळे त्यांची हत्या केली जाते, असे त्यांनी सांगितले. दुग्धशाळांचे कार्य दाखवणारे व्हिडीओ दाखवण्यात आले. वनस्पतीआधारित आहाराची व्यवहार्यता सिद्ध करणारे पुनरावलोकन केलेले संशोधन सादर केले. धक्कादायक फुटेज पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
कृत्रिम बीजरोपणावर बंदी नाही
गायींना माता म्हणून पूजणाऱ्या देशाच्या विरोधाभासावर खुशबू देसाई यांनी भाष्य केले. गायींना माता मानणाऱ्या देशात कृत्रिम बीजरोपणावर कोणत्याही राज्यात बंदी नाही, हे विचित्र आहे. छत्तीसगडवगळता कोणत्याही राज्यात म्हशींच्या हत्येला बंदी नाही. दूध उत्पादन थांबल्यावर त्यांना गोशाळांमध्ये पाठवले जाते, असे त्या म्हणाल्या.
