धोनीने कर्णधारपद सोडलं

आयपीएल २०२४

मुंबई : आयपीएल २०२४ चे पडघम वाजत असतानाच चेन्नई सुपर किंग्जचा हीरो एमएस धोनीने अचानक संघाचं कर्णधारपद सोडलं असून आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. धोनीने गेल्या मोसमात चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल जिंकून दिले होते आणि आता त्याने संघाची कमान गायकवाड याच्याकडे सोपवली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 17व्या हंगामाचा पहिला सामना शुक्रवारी सीएसकेचा आरसीबीविरुद्ध होणार आहे.
याआधी २०२२ साली चेन्नई सुपर किग्जने धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवलं होतं. मात्र, तो ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली. गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले. आयपीएलने काल सर्व कर्णधार आणि ट्रॉफीसह फोटो त्यांच्या ट्विटवर अकाऊंटवर शेअर केला. यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ऐवजी फोटोसेशनला ऋतुराज गायकवाडने उपस्थिती लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *