अशोक गायकवाड
नवी मुंबई : नवी मुंबई हे स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणामुळे जलसमृध्द शहर असले तरी प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला किती पाण्याची गरज आहे हे ओळखून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन विविध माध्यमांतून जागतिक जलदिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असून पिण्यायोग्य पाण्याचे पृथ्वीवरील अत्यल्प प्रमाण लक्षात घेऊन उपलब्ध जलस्त्रोतांचे संवर्धन करणे व पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे लक्षात घेत संयुक्त राष्ट्र संघाने १९९३ पासून २२ मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासमवेत सामुहिक जलशपथ घेण्यात आली. या प्रसंगी माजी आयुक्त राजेश नार्वेकर, माजी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने ‘शांततेसाठी पाण्याचा वापर हे जागतिक जल दिनाचे घोषवाक्य जाहीर केले आहे. आपण या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो. यासाठी देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची मी शपथ घेत आहे अशा आशयाच्या जल शपथेमध्ये पाणी बचत व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच पाण्याचा थेंब अन् थेंब साठवून ‘कॅच द रेन’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी मी संपूर्ण सहयोग देईन व पाण्याला एक अनमोल संपदा मानून पाण्याचा वापर करेन अशीही शपथ घेण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मी, माझे कुटुंबिय व मित्र आणि शेजाऱ्यांना प्रेरीत करेन असेही प्रतिज्ञेत नमूद आहे.