मुंबई: राज्य सरकारने दुष्काळाबाबत कुठलीच भूमिका घेतलेली नाही. सातत्याने पाठपुरावा करून देखील सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आता मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही, असं शरद पवार म्हणाले.. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.
