भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यात मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून म्हस्के यांना ४० हजारांचे मताधिक्य मिळाले, परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी लक्षात घेतली तर हे मताधिक्य तब्बल २९ हजारांनी कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यावेळचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांना तब्बल ६९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

नुकत्याच झालेल्या मतमोजणीत महायुतीचे नरेश म्हस्के यांना मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात एक लाख २७ हजार ९१३ मते पडली आहेत, तर मविआच्या राजन विचारे यांना ८७ हजार २६३ मते मिळाली. या दोघांमध्ये ४०,६५० मतांचा फरक आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राजन विचारे यांना मिरा-भाईंदर मतदारसंघातून एक लाख ३३ हजार ९९६, तर त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना ६४ हजार ७७६ मते मिळाली होती. त्यावेळी विचारे यांना या मतदारसंघात ६९ हजार २२० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत महायुती हेच मताधिक्य कायम ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीचे मताधिक्य मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ हजार मतांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या निवडणुकीत भाजप व फुटीपूर्वीच्या शिवसेनेची युती होती. २०१९ मध्ये राजन विचारे यांना भाजप व शिवसेनेची एकत्रित मते मिळून त्यांनी ६९ हजारांची आघाडी घेतली होती, मात्र २०२४ निवडणुकीचे राजकीय चित्र वेगळे होते. यावेळी भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्रितपणे निवडणूक लढली, तर विरोधात ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार गट एकत्र लढले, मात्र मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे, तर अजित पवार गटाची ताकद त्याहून कमी आहे. त्यामुळे म्हस्के यांची सर्व मदार भाजपच्या मतपेढीवर अवलंबून होती.

या मतदारसंघात शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाची मते अधिक आहेत. शिवाय ठाकरे गटाचे राजन विचारे यांना यावेळी काँग्रेसची साथ मिळाली. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मविआला अधिकची २३ हजार मते मिळाली. परिणामी महायुतीचे मताधिक्य ६९ हजारांवरून घटून ४० हजारांवर आले. या ४० हजारांच्या मताधिक्यात भाजपने केलेल्या सहकार्याचा सर्वात अधिक वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *