विश्लेषण
प्रमोद मुजुमदार
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी यापुढे हिंदी पट्टयातला पक्ष म्हणून शिक्का मारता येणार नाही. मित्रपक्षांच्या मदतीने भाजपने तमिळनाडूमध्ये शिरकाव केला. कर्नाटकमध्ये फार पडझड होऊ दिली नाही. मुत्सद्दी धोरणे आखत आंध्र आणि ओडिशामध्ये सत्तेत शिरकाव केला. आता अरुणाचल प्रदेशपासून गुजरातपर्यंत आणि दिल्लीपासून केरळपर्यंत भाजपच्या सांस्कृतिक ओळखीला मिळालेली मान्यता दिसते.
काँग्रेस हा देशात कार्यकर्त्यांचे सर्वत्र जाळे असणारा आणि देशभरात लोकप्रतिनिधी असणारा एकमेव पक्ष होता. आता काँग्रेसची तशी अवस्था राहिलेली नाही. देशाच्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेस नावालाच आहे. लोकसभेच्या ताज्या निवडणुकीत भाजपच्या जागा भलेही कमी झाल्या असतील, काही राज्यांमध्ये कमी जागा मिळाल्या असतील; परंतु आता भाजपवर फक्त हिंदी पट्टयातला पक्ष म्हणून शिक्का मारता येणार नाही. मित्रपक्षांच्या मदतीने भाजपने यापूर्वीच तमिळनाडू, पाँडिचेरीमध्ये शिरकाव केला होता. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या हातून सत्ता गेली; परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्येही भाजपने कर्नाटकमध्ये फार पडझड होऊ दिली नाही. चंद्राबाबू नायडू यांच्याशी केलेल्या हातमिळवणीचा फायदा त्यांना लोकसभेला झालाच; शिवाय विधानसभेत काही जागांच्या मदतीने का होईना, भाजपने तिथे सत्तेत शिरकाव केला. आता अरुणाचल प्रदेशपासून गुजरातपर्यंत आणि थेट दिल्लीपासून केरळपर्यंत भाजपचे कमळ उगवलेले दिसते. भाजप हा देशव्यापी पक्ष असल्याचे चित्र तिथे दिसते. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये अडखळत असतानाही दक्षिणेत भाजपची वाढ झाली. केरळमधील एका जागेवरील विजय आणि तेलंगणा तसेच आंध्रमधील जागा आणि मतांमध्ये झालेली वाढ ही त्याची स्वीकारार्हता वाढल्याचे द्योतक आहे. तामिळनाडूमध्ये पक्षाचे खाते उघडता आले नसले, तरी मतांची टक्केवारी वाढली आहे. त्याच वेळी 2019 च्या तुलनेत कर्नाटकमध्ये कमी जागा आणि कमी मते मिळाली असली तरी मोठी पडझड झालेली नाही. केरळमध्ये सुमारे 16.58 टक्के मतांसह एक जागा जिंकणे, आंध्र प्रदेशमध्ये बारा टक्के मते घेत तेलुगू देसमसोबत खुबीने आघाडी करत तीन जागा जिंकणे आणि तेलंगणामध्ये पूर्वीपेक्षा दुप्पट जागा जिंकणे, ही भाजपच्या सांस्कृतिक ओळखीला मिळालेली मान्यता दर्शवते.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपच्या वाढत्या प्रवेशाला सांस्कृतिक पुनर्जागरणाचा नाद म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. भाजपने अयोध्या आणि आजूबाजूच्या जागा गमावल्या असतील; पण त्यामुळे राम मंदिराचे महत्त्व कमी होत नाही. दक्षिणेत कर्नाटकबाहेर भाजपच्या वाढत्या स्वीकृतीच्या मुळाशी राम आहे. त्यांना प्रतीके बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनातन संस्कृतीची जपणूक आणि त्यासंदर्भातील चिंतेतून दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या राज्यांमधील हिंदूही संबंधित राज्यांची सरकारे करत असलेल्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणांवर नाराज आहेत. त्यांना सर्वत्र विशेष लक्ष आणि विशेष ओळख दिली आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर सनातन किंवा हिंदू संस्कृतीच्या चिंतेला मान देण्याचे काम सुरू झाले. आपली संस्कृती आणि वारसा जतन करण्यासाठी आवाज उठवण्याची हिंमतही त्यांनी निर्माण केली. हा आवाज कमकुवत आहे; परंतु त्यांना मोदींचा आधार वाटतो. या आधारामुळे मोदी यांच्यावरील विश्वास वाढत आहे. विश्व हिंदू परिषद आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी आणि रामलल्लाच्या अभिषेकाच्या निमंत्रणासाठी दक्षिणेतील अनेक गावांना भेट दिली. दक्षिणेकडील राज्यांना मोदी यांनी दिलेल्या धार्मिक भेटींमुळे सनातन धर्माच्या अनुयायांनाही मोदींसारख्या नेत्याला पाठिंबा देऊन आपला सांस्कृतिक स्वाभिमान जपला जाऊ शकतो, याचा विश्वास निर्माण झाला. हे सांस्कृतिक पुनर्जागरण आहे.
मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची हिंदुत्ववादी प्रतिमा, महिलांच्या सुरक्षेबद्दलची संवेदनशीलता आणि गुन्हेगारांबाबत उचलल्या जात असलेल्या कठोर पावलांमुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या हिंदूंमध्येही आदराचे स्थान निर्माण झाले आहे. ताज्या निकालांमध्ये भाजपला कमी जागा मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी वाढल्याने भविष्यातील भाजपच्या आशा वाढणार आहेत. गेल्या काही काळात कोणताही भेदभाव न करता पंतप्रधानांनी दक्षिणेकडील राज्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. त्याचा पुरावा म्हणजे यंदाच्या निवडणुकीपूर्वी केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हजारो कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले गेले आणि काही प्रकल्पांची भूमिपूजने केली गेली. राज्यांच्या विकासाच्या आकांक्षांना पूर्ण सहकार्य करण्याच्या केंद्राच्या वचनबद्धतेची ही झलक आहे.
देशात असा एक मोठा वर्ग आहे, ज्याचा संपूर्ण भर दक्षिणेत फक्त जातीचे राजकारण करण्यावरच होता. कर्नाटक आणि केरळ वगळता दक्षिणेत इतरत्र लोक जातीय अस्मितेचा पुरस्कार करणाऱ्या प्रादेशिक पक्षांवर अधिक विश्वास ठेवतात. त्यांना राष्ट्रीय राजकीय प्रवृत्तीसोबत वाटचाल करायची नाही. मात्र दक्षिणेत भाजपला मिळालेल्या ताज्या मतांवरून दिसून येते की या राज्यांमधील लोक जाती आणि प्रदेशाच्या नावावर मतदान होत असल्याच्या आरोपांना फारसे महत्त्व देत नाहीत. देशाच्या इतर भागातील लोकांच्या बरोबरीने चालण्यासही ते तयार आहेत. एखादा नेता आपल्या चिंतांचा आदर करत असेल, आपल्या संस्कृतीची ओळख कायम ठेवत असेल तर या भागातील लोक अशा नेत्याबरोबर यायला तयार आहेत, हा भाजपच्या दक्षिण दिग्विजयाचा अर्थ आहे. काशीतील तमिळ संगम, काशी ते कांची, राम ते राम सेतू, अयोध्या ते धनुष्कोडी अशा प्रतिकांचा संगम घालणारे मोदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाताना आगामी काळात नव्या अजेंड्यावर काम करत आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये ‘टीडीपी’च्या एकतर्फी विजयाने चंद्राबाबू नायडू केंद्रातही किंगमेकर बनले. लोकसभेच्या 25 पैकी 16 जागा जिंकून ‘टीडीपी’ हा ‘एनडीए’मधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. एकहाती बहुमताच्या आकड्यापासून भाजप दूर राहिल्याने दिल्लीतील सत्तेची चावी पुन्हा नायडू यांच्या हाती आली. अशा स्थितीत आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबूंचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. दुसरीकडे, 2019 मध्ये प्रचंड विजय मिळवणाऱ्या वायएसआर काँग्रेसचा पराभव करून लोकांनी क्षुद्र राजकारण नाकारले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्राबाबूंनी आपल्या मागील कामाबद्दल आणि नवीन आंध्र प्रदेशाच्या रोडमॅपबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. श्री. नायडू, अभिनेते-राजकारणी पवन कल्याण आणि जातीय समीकरणांच्या संयोजनानेही ‘एनडीए’च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे एन. टी. रामाराव यांच्या कन्या आणि माजी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभेच्या तीन जागा जिंकण्यात यश मिळवले तर विधानसभेच्याही आठ जागा जिंकल्या. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. नायडू यांच्या नेतृत्वाखालील ‘टीडीपी’ला आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या कम्मा समुदायाचा पाठिंबा मिळाला. नायडू हे कम्मा समाजाचे आहेत. एनडीए युतीतील पवन कल्याण यांचा कापू आणि नायडूंचा कम्मा समाज एकत्र आल्याने ‘एनडीए’चा फायदा झाला.
दरम्यान, ओडिशामध्ये प्रथमच भाजपचे सरकार स्थापन होत आहे. 24 वर्षांमध्ये प्रथमच सरकारमध्ये बदल होत असून नवीन पटनायक युगाचा अंत झाला आहे. भाजपने केवळ विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली नाही तर लोकसभा निवडणुकीतली कामगिरीही सुधारली. निवडणुकीपूर्वी भाजप आणि बीजू जनता दल (बीजेडी) यांच्यात युती करण्याचा प्रयत्न होता, मात्र ते न जमल्याने भाजप-बीजेडीने एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली. भाजपने ओडिशाची ओळख, ओडिशाचा अभिमान हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याचा परिणामही दिसून आला. नवीन पटनायक यांच्याऐवजी भाजपने त्यांचे जवळचे सहकारी व्ही. के. पांडयन यांच्यावर हल्ला करून निवडणुकीमध्ये मोठा मुद्दा बनवला. ओडिशामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करत असताना ओडिशातील लोकसभेच्या 21 पैकी 19 जागाही भाजपच्या खात्यात आल्या. अटलबिहारी वाजपेयी केंद्रात सत्तेवर असताना त्या सरकारमध्ये नवीन पटनायक पोलाद आणि खाण मंत्री होते. इतर राज्यांमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एनडीएला या राज्यांमधले निकाल महत्त्वाचे ठरले. अन्यथा, भाजप दोनशे जागांच्या आतच राहिला असता.
एकंदरीत, भाजपची वरकरणी झालेली पिछेहाट दिसते, पण मुत्सद्दीपणे केलेल्या खेळ्या दिसत नाहीत. अशा अनेक खेळ्या केल्याने भाजपचा मार्ग पुढील काही वर्षे सूकर राहू शकतो.
(अद्वैत फीचर्स)