वाचक मनोगत

पालिकेच्या अन्न व औषध विभागाच्या सूचनेनुसार उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स,गाड्या तसेच दुकानांना खाद्यपदार्थ झाकून ठेवणे बंधनकारक आहे. जाळीदार झाकणीने किंवा पारदर्शक प्लॅस्टिकने असे पदार्थ झाकून ठेवणे अपेक्षित असते; मात्र मुंबई-ठाण्यासारख्या प्रदूषित शहरात पालिकेच्या या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होताना दिसते. आजमितीला प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई शहर दिल्ली-कोलकातासारख्या शहरांशी स्पर्धा करत आहे. पावसाळा जवळ आल्याने मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांची आणि उड्डाणपुलाची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत तर अनेक ठिकाणी टोलेजंग इमारती उभारणीचे कामही जोमात सुरु आहे. या सर्वांतून हवेमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे आणि मातीचे कण मिसळले जात आहेत. तर मुंबईतील वाढत्या वाहनसंख्येमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाने अगोदरच धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाळ्याच्या आरंभीच्या काळात विषाणूंची मोठ्या प्रमाणात पैदास होत असल्याने साथीचे आजार पसरतात. यंदाच्या जीवघेण्या उकाड्याने राज्यातील जनतेला जगणे नकोसे केले होते. आता पावसाच्या तोंडावर पसरणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे असणार आहे त्यासाठी उघड्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई करून पालिकेने मुंबईकरांना आश्वस्त करावे.
-सौ. मोक्षदा घाणेकर,
काळाचौकी, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *