शिंदे गटाची रणरागिणी राष्ट्रवादीत दाखल, चळवळीतल्या नेत्या सुरेखा खेडकर यांची सुधाकर घारेंना साथ

अशोक गायकवाड

कर्जत : शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी पुन्हा एकदा शेवटपर्यंत उत्सुकता ताणत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा पक्षप्रवेश कर्जतच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयात पार पडला. काही दिवसांपुर्वी अमोल बांदल पाटील यांच्या प्रवेशानंतर सुरेखा खेडकर यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाने दुसरा झटका शिंदे गटाला बसला आहे.*
एकीकडे लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना दुसरीकडे सुधाकर घारेंकडून विधानसभेची बांधणी जोरात सुरु असल्याचे दिसुन येत आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना अमोल पाटील यांनी खिशातून चॉकलेट, गाजर आणि कॅटबरी बाहेर काढली आणि राष्ट्रवादीत हे दिल जात नाही असे सांगितले. यानंतर सभागृहात एकच हषा पिकला. शिंदे गटातून आलेल्या सुरेखा खेडकर यांनी सुद्दा शिंदे गटावर चांगलीच तोफ डागली. यावेळी बोलताना सुरेखा खेडकर म्हणाल्या की, “माझी खुप दिवसाची इच्छा होती हे कार्यालय पाहण्याची. आज तो योग आला. भविष्यात खोपोली शहरातून महीलांच संघटन उभ करण्यासाठी भाऊ तुमच्यासोबत राहू. माझ्या वार्डातून राष्ट्रवादीला आजवर न मिळालेली लीड मिळवून देईल आणि सुधाकर भाऊंना आमदार करण्यासाठी जिवाच राण करेल. ज्यावेळी शिंदे गटात जायच होत त्यावेळी रात्रभर झोप लागली नव्हती पण आज चांगली झोप लागली. मी कुटुंबाचा विचार न करता राबत राहीले आणि स्थानिक नेत्यांकडून आम्ही घेतलेल्या कार्यक्रमांवर बहीष्कार टाकला जायचा. योग्य सन्मान आम्हाला पक्षात मिळाला नाही. महिलांच्या कार्यंक्रमात पुरुषांनी सुत्रसंचलन कराव लागत. कारण महिलेला संधी दिली, तिच नेतृत्व दिसल तर आपण कुठेतरी डॅमेज होऊ. ही भीती त्यांच्या मनात आहे. फक्त शेठ लोकांना शेठ करायच काम शिंदे गटात सुरु आहे. बऱ्याच जनांना वाटल असेल ही पक्ष कधीच सोडणार नाही परंतू या कलयुगात ही बहीण तरी कीती दिवस अन्याय सहन करणार. या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमदार या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय याठिकाणी मी घेतला. येथे महिलांचा उचित सन्मान केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुधाकरजी घारे यांनीही बोलताना चांगलीच टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी जागतीक पाणी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पक्षप्रवेशाच्या निमीत्ताने त्यांनी सुरेखाताई खेडकर यांच्या कामाचे कौतुक केले. सुधाकर घारे म्हणाले की, “सर्वांना विश्वासात घेऊनच आपल्या पक्षात निर्णय घेतले जातात. पक्षबांधणीसाठी खालापूर तालुक्यात सुरेखाताईंना जी मदत लागेल ती पुरवली जाईल. आज मला या गोष्टीच वाईट वाटत की छत्तीशी मध्ये एकाचवेळी तीन ठिकाणी उपोषण सुरु आहेत. स्थानिकांना प्राधान्य नाही असे लोकांचे मत आहे. कारण काही पक्षात ठेकेदार वाढले आहेत. पण आपल्या पक्षात ठेकेदार नाहीत, आपल्याला काय भाचा पण नाही, आपला भाऊ कॉंन्ट्रयक्टर पण नाही. आपला कार्यकर्ता कसा सक्षम होईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आपण बाकी ठिकाणी बघतोय तीन चार टोल असतात. भाच्याचा टोल, भावाचा टोल, मेहुण्याचा टोल. आपल्याकडे कसले टोल नाहीत. आपल्या पक्षात आलेल्या नविन मंडळींचा सन्मान राखण्याच काम आपल्याला करायच आहे.” यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी नाव न घेता केलेली टोलेबाजी कर्जत-खालापूर मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.