राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते सुधाकर घारे यांनी ठणकावले

अशोक गायकवाड

कर्जत : जर सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे आमदार महेंद्र थोरवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते सुधाकर घारे यांनी ठणकावले.
शिवसेना शिंदे गटाचे कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे आणि तटकरे कुटुंबिय यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. परंतु महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व भाजप सोबत सत्तेत असल्याने हा वाद पेटणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली असून रायगड लोकसभेवरून ऐन शिमग्यात महेंद्र थोरवे व तटकरे कुटुंबिय वाद चांगलाच पेटला असल्याचे दिसून येत आहे. आ. महेंद्र थोरवे यांनी रायगड लोकसभेतील पेण येथे शिवसेनेच्या झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांच्यावर जहरी टिका केली होती. ही टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी आ. महेंद्र थोरवे यांचा खरपूस समाचार घेत निषेध व्यक्त केला. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा निवडणुकीत महायुती जो उमेदवार देईल, त्याचा मनापासून प्रचार करू, असा निर्धार देखील बोलून दाखविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचा कोकण लोकसभेत कडेलोट करण्याचे विधान कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याने आता मावळ लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. आ. महेंद्र थोरवे यांच्या विधानामुळे रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. थोरवे यांच्यावर ताशेरे ओढत त्यांचा तिव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर घारे म्हणाले की, आमदार साहेब स्वतःला बदला आणि आमच्या नेत्यावर टिका करून स्वतःचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर जशास तसे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार. कोकणात जर खा. सुनील तटकरे यांच्यावर टिका किंवा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दगाबाजी कराल तर मावळ लोकसभा मतदार संघात आमचीही राजकीय शक्ती प्रचंड आहे असा इशारा घारे यांनी दिला. आमदार जर वारंवार तटकरे यांच्यावर तोंडसुख घेत असतील तर युती काय कामाची? मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांची प्रचंड ताकद असून कर्जत – खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी एक नंबरला आहे हे लक्षात असू द्या अशी तंबी सुधाकर घारे आणि पदाधिकारी यांनी दिली. जर सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे आमदार महेंद्र थोरवे यांना ठणकावले.\

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *