मुंबई – कठीण काळात महाराष्ट्रात नाना पटोलेंनी ज्या पद्धतीने काँग्रेस उभी केली ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. नुसतीच उभी केली नाही तर आर्थिकदृष्ट्याही चांगल्याप्रकारे सावरलं. तुम्ही जे काम केले ते सदैव लक्षात राहणारं आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं कौतुक केले आहे.

काँग्रेसच्या नवनियुक्त खासदारांची मुंबईत टिळक भवनला बैठक पार पडली. या बैठकीत सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, गेल्या १५ वर्षानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये अभूतपूर्व इतिहास घडला आहे. नाना पटोलेंच्या कारकि‍र्दीत हा इतिहास घडतोय त्याचा आनंद आहे. एका खासदारावरून १४ खासदार निवडून आले आहेत. हे चित्र महाराष्ट्रात आम्हाला दिसलं नव्हते. नानाभाऊ रात्रदिवस काम करत होते. आज सकाळी एका जिल्ह्यात, दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात आणि संध्याकाळी तिसऱ्या जिल्ह्यात अशाप्रकारे महाराष्ट्र नाना पटोलेंनी पिंजून काढला असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रदेशाध्यक्ष म्हणून जे जे काही करावे लागते ते त्यांनी प्रामाणिकपणाने आणि सढळ हाताने केले. मी दोनदा अध्यक्ष  राहिलो आहे, जे त्यांनी केले ते आम्हाला करता आलं नाही. पण आज त्याचे चांगल्या प्रकारे काँग्रेसला विजय मिळाला आहे. या विजयाने आम्ही भारावून गेलो आहोत. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. आमच्या सहकाऱ्यांना दिशा दाखवली. नानाभाऊ तुम्ही असेच कार्य करत राहा. तुम्हाला पक्षश्रेष्ठी पुढे घेऊन जातील असा विश्वास सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विदर्भात खूप चांगल्या प्रकारे यश मिळाले. आमच्या विशाल पाटलांनी कमाल केली. अपक्ष लढले आणि जिंकून आल्यानंतर इथे आले. विशाल काँग्रेससोडून कधी जाऊ शकणार नाही. त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी महाराष्ट्रात काँग्रेसला योगदान दिले. जनतेच्या कल्याणासाठी छत्रपती शाहू काम करतात. सामाजिक विचारांचा इतिहास ज्यांनी रचला त्यांचे वंशज शाहू छत्रपती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेत. नव्या राजकीय वाटचालीत शाहू छत्रपतींचा जयजयकार जनतेने केले. याला कारणीभूत नाना पटोले आहेत. ज्यारितीने त्यांनी काँग्रेसची मान उंचावण्याचा प्रयत्न केला. अभूतपूर्व यश मिळवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो असंही सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *