मुंबई : शिवसेनासोबत नसती तर काँग्रेसच्या इतक्या जागा आल्या असत्या का? हा साधा प्रश्न आहे. काही ठिकाणी आमची मदत झाली नसती आणि त्यांची आम्हाला झाली नसती तर हे यश मिळालं असतं का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

अहमदनगरमध्ये निलेश लंके जिंकावेत यासाठी आमच्या शिवसेनेनं जीवाचं रान केलंय. शिरूर, बारामती काम केलंय. महाविकास आघाडीत कुणी मोठा आणि कुणी छोटा भाऊ नाही. आम्ही एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढू असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही विधानसभा निवडणूक एकत्रित लढू. लोकसभेत १५० जागांवर मविआला आघाडी दिसत असली तरी आम्ही साधारण १८०-१८५ जागा जिंकू. आमच्या तिघांमध्ये कुठलाही अहंकार आणि चढाओढ नाही. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. लवकरच येणाऱ्या काही दिवसांत आम्ही विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करू. जागांबाबत आमच्यात काहीही अडचण नाही असं त्यांनी सांगितले. विधानसभेच्या जागावाटपात काँग्रेसकडून जास्त जागा मागितल्या जातील या प्रश्नाला उत्तर देताना राऊतांनी आम्ही सोबत असल्यानं हे यश मिळाल्याचं म्हटलं आहे.

तसेच जो गुंड असतो, तो आपल्या टोळ्या वापरून विरोधकांचा खात्मा करत असतो. हे मुंबईत पाहिलंय. तसं भाजपाचे ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे शार्प शूटर आहेत. भाजपाला २४० जागा मिळाल्यात त्यातील १०० जागा या टोळ्यांच्या माध्यमातून मिळवल्या आहेत. या टोळधाडी आहेत. गेल्या १० वर्षात या टोळ्यांच्या माध्यमातून भाजपानं जो दहशतवाद माजवला, हा दहशतवाद जम्मू काश्मीरमधील दहशतवादी आणि खलिस्तानी दहशतीपेक्षा मोठा आहे असा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केला.

दरम्यान, मी फार जबाबदारीनं हे विधान करतोय. हा दहशतवादच आहे. आर्थिक दहशतवाद आहे. देशातील प्रमुख एजन्सी ज्यांच्यावर देशाचा विश्वास होता, या संस्था खरोखरच काही चांगले काम करतील, भ्रष्टाचार नष्ट करतील परंतु या संस्थांनी गुंड टोळ्यांचे सदस्य म्हणून काम केले असा निशाणा संजय राऊतांनी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागावर लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *