मनीष वाघ यांच्या ‘जीवन त्यांना कळले हो…’ पुस्तकाचे प्रकाशन

ठाणे : ‘मुबलक आणि सहज मिळणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर जलजागर महत्त्वाचा आहे. त्यातून भविष्यातल्या पाणी प्रश्नाला उत्तर मिळू शकते. अन्यथा, पाण्यावाचून जगण्याची भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीतही पाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचे कार्य नक्कीच स्पृहणीय आहे. प्रत्येक माणसानं अशा उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यात सहभाग नोंदवला पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ, ‘प्रयास’ या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेचे समन्वयक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे अॅड. सुनिल तिवारी यांनी व्यक्त केले. जागतिक जल दिनानिमित्त साहित्यिक पत्रकार पर्यावरण कार्यकर्ते मनीष चंद्रशेखर वाघ यांच्या ‘पाणीदार माणसे… जीवन त्यांना कळले हो’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
शुक्रवारी ठाण्यात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार राजेश दाभोळकर, साहित्यिक विनोद पितळे, पर्यावरण अभ्यासक कविता वालावलकर, युवा सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे निशिकांत महांकाळ तसेच सिद्धी फ्रेण्ड्स पब्लिकेशनचे प्रकाशक आणि संगणक प्रशिक्षक सुभाष कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी लेखक मनीष वाघ यांनी पुस्तकामागील आपली भूमिका विषद केली. राजेश दाभोळकर यांनी पत्रकार म्हणून पर्यावरण, प्रदूषण आणि पाणीप्रश्नांविषयी आपली मते मांडली. कविता वालावलकर यांनी सध्या सुरू असलेल्या जलप्रदूषणाच्या संदर्भात होत असणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. विनोद पितळे यांनी केवळ लेखनापुरताच हा विषय सीमित न राहता प्रत्यक्षात काम करण्यावर आपला भर असल्याचे सांगितले.
अॅड. तिवारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, विविध स्तरावरून पाण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करण्यावर भर दिला. ‘पाणीदार माणसे… या पुस्तकातून ज्या ज्या व्यक्तींनी समाजाच्या उत्कर्षासाठी जलजागर केला आहे, त्यांचे केवळ ऋण न मानता, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन काम केले पाहिजे. त्यातूनच एक नवा सक्षम समाज, एक नवा स्वयंपूर्ण देश घडू शकेल,’ असा आशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखवला. निशिकांत महांकाळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *