नागपूर ते गांधीनगर विशेष विमानातून-
बित्तंबातमी विशेष
भाग पहिला
अविनाश पाठक
येती लोकसभा निवडणूक आमच्या विरोधकांनी भलेही प्रतिष्ठेची केली असेल, मात्र भारतीय जनता पक्ष नेहमीप्रमाणेच ही निवडणूक लढवणार आहे. गत दहा वर्षात आम्ही जी काही चांगली कामे केली, त्या कामांच्या जोरावर आम्ही देशातील मतदारांना पुन्हा एकदा कौल मागणार आहोत आणि मतदार आम्हाला कौल देतील, येत्या लोकसभा निवडणुकीत एक उमेदवार म्हणून आपण जास्त प्रचार न करता लोकांच्या भेटी घेऊन हार्ट टू हार्ट प्रचार करणार आणि पाच लाख मतांच्या फरकॉने जिंकूनही येणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बित्तंबातमीशी बोलताना व्यक्त केला.
नागपूरहून गांधीनगर (गुजरात) येथे विशेष विमानाने एका खास कार्यक्रमासाठी जात असताना नागपूरच्या काही निवडक पत्रकारांशी गडकरी यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.त्यावेळी ते बोलत होते. येणारी निवडणूक आणि त्या संदर्भात पत्रकारांच्या मनात असलेले प्रश्न या बाबत त्यांनी पत्रकारांना मोकळी उत्तरे दिली.
गत १० वर्षात आपण अनेक कार्यक्रमांमधून जनसामान्यांशी संवाद साधला आहे. त्याशिवाय खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव, औद्योगिक परिषद, आरोग्य शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांच्या केलेल्या नि:शुल्क शस्त्रक्रिया, त्यांच्यासाठी आयोजित केलेले शेगाव दर्शन कार्यक्रम, भजनी मंडळांसाठी आणि अध्यात्म प्रेमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विविध कार्यक्रम,असे उपक्रम राबवून जनतेला जास्तीत जास्त सेवा कशा देता येतील, त्यांच्या हृदयापर्यंत कसे पोहचता येईल यचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जनता आपल्याला कौल देईल आणि यावेळी आपण रेकॉर्ड ब्रेक पाच लाख मतांच्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्ही गेल्या दहा वर्षात जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी बरीच कामे केली आहेत. अयोध्येत राम मंदिर उभे झाले आहे. ३७० कलम हटवून काश्मीर पूर्वस्थितीवर आणले जात आहे. मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्ती दिली आहे. इतरही आघाड्यांवर आम्ही जास्तीत जास्त धडाक्याने निर्णय घेतले आहेत. सबका साथ सबका विकास हे तत्व ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत. त्यामुळे जनता आम्हाला न्याय देईल आणि आम्ही अबकी बार चारसो पार” हे लक्ष्य सहज साध्या करू असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.भारत ही तिसरी आर्थिक महाशक्ती बनवण्याचे स्वप्न असल्याचे सांगून २०२९ च्या आसपास आम्ही आमचे लक्ष्य गाठलेले असेल असे गडकरी यांनी स्पष्ट केले. या देशात प्रत्येक गरिबाला दारिद्र्यरेषेच्या वर आणायचे असेल तर सर्वप्रथम खेडी समृद्ध करावी लागतील. स्वातंत्र्यानंतर देशातील बहुसंख्य नागरिक खेड्यातून शहराकडे आले आहेत. त्याला कारण कृषीचे उत्पन्न कमी झाले आहे. आज देशात ६५ टक्के जनता कृषीवर अवलंबून आहे. मात्र देशाचा कृषी क्षेत्रातील ग्रोथ रेट हा फक्त १२ ते १३ टक्के आहे. त्या तुलनेत औद्योगिक क्षेत्राचा ग्रोथ रेट हा २५ टक्क्याच्या आसपास आहे, तर सर्व सर्विस सेक्टरचा ग्रोथ रेट ५५ टक्के आहे. ही परिस्थिती बदलावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्याला समृद्ध करावे लागेल. आज शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेतीतील उपज वगळता इतर वेस्ट मटेरियल पासून ऊर्जा निर्मिती आणि इंधन निर्मिती होऊ शकते. यावर लक्ष केंद्रित केले तर आपला शेतकरी फक्त अन्नदाता न राहता ऊर्जादाताही बनवू शकतो असा दावा त्यांनी केला. असे जर झाले तर आपल्याला इंधन बाहेरून आयात करावे लागणार नाही, तर आपणच इथून इंधन निर्यात करू शकू असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. आतापर्यंत दोनदा खासदार म्हणून लोकसभेत जास्तीत जास्त जनसेवा करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या वेळेसही फक्त जनसेवा आणि विकसित भारत या संकल्पनेवर काम करणे हेच आपले लक्ष्य राहणार असल्याचे ते म्हणाले.
ग्रामीण भाग समृद्ध करायचा असेल तर कृषी क्षेत्रात आणि ग्रामीण क्षेत्रात जल जमीन जंगल विकसित करणे हे लक्ष्य ठेवून काम करावे लागेल. कृषी क्षेत्र समृद्ध झाले तर रोजगार निर्मिती ही सहज होईल. असे झाले तर समृद्धीचे स्वप्न दूर नाही असेही ते म्हणाले.
आज महिला सक्षमीकरणाचा जमाना असला तरी देशाच्या लोकसभेत गत ७० वर्षाच्या कालखंडात महिलांना फार कमी प्रतिनिधित्व मिळाले आहे, याकडे लक्ष वेधले असता आता २०२९ नंतर ही परिस्थिती बदलेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. आम्ही महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे २०२९ नंतर महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. आज देखील भारतीय जनता पक्ष जिथे शक्य आहे तिथे महिलांना प्राधान्याने उमेदवारी देतो आहेच.मात्र काही वेळा निवडून येण्याचे गणित विचारात घ्यावे लागते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सध्या भारतीय जनता पक्ष सुडाचे राजकारण करीत आहे असा विरोधकांकडून आरोप होतो आहे. याबाबत विचारले असता गडकरी यांनी हा आरोप फेटाळला. कायदा आपले काम करीत आहे. त्यामुळे ही ओरड निरर्थक आहे असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक याबाबत छेडले असता कायद्याने सर्व होते आहे आणि कायदाच निर्णय देईल असे ते म्हणाले.
एका काळात राजकारणात पक्षभेद आणि मतभेद असले तरी मनभेद नसायचे, आता मात्र सर्वांनीच पातळी सोडली आहे आणि अगदी खालच्या पातळीवर जाऊन परस्परांवर टीकाटिपणी होत आहेत, याबद्दल गडकरी यांनीही खंत व्यक्त केली. या संदर्भात सर्वच पक्षांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून आचारसंहिता ठरवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गत दहा वर्षाच्या काळात भाजपने रोजगार निर्मिती निश्चित केली, मात्र ज्या तुलनेत रोजगार येत आहेत त्याच तुलनेत लोकसंख्याही वाढते आहे ,नागपूरपुरते बोलायचं झाले तर आम्ही मिहानच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण केले. मात्र त्याच तुलनेत नागपूर परिसरातील लोकसंख्याही वाढते आहे हे लक्षात घ्यायला हवे. यावरही लवकरच उपाययोजना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यावरण संरक्षण हे अत्यंत गरजेचे असून शालेय स्तरावरच त्याचे शिक्षण द्यायला हवे. तसे झाले तर बऱ्याच समस्या कमी होतील असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
वन नेशनल वन इलेक्शन ही संकल्पना निश्चितच चांगली आहे. मात्र त्यात काही व्यावहारिक अडचणी येऊ शकतात. त्या समस्यांवर विचार करून मार्ग काढला तर योजना राबवण्यावर विचार होऊ शकेल असे गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले..