ठाणे: जिल्ह्यातील गरोदर माता व बालक लसीकरण विना राहू नये तसेच बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ‘यू विन पोर्टल’वर नोंद करून गरोदर माता व बालकांचे लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांचे लसीकरण वेळेत होण्यासाठी मदत होणार असून यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

कोरोनामध्ये लसीकरणानंतर नोंद केलेल्या नागरिकांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त होत होता. कोरोना काळात घेतलेल्या लस संदर्भातील माहिती देखील या यू विन पोर्टल वर उपलब्ध असल्यामुळे बालकांचे नोंदणी करणे सोईचे होणार आहे. त्याच धर्तीवर आता बालकांच्या विविध प्रकारच्या लसीकरणातही लस मिळाल्यानंतर नोंदीत मोबाईलवर ‘यू विन पोर्टल’द्वारे संदेश येईल. लसीकरणाशी संबंधित सर्व तपशिलांची नोंद पोर्टलवर केली जाईल. लाभार्थ्यास कोणत्याही राज्यात अथवा जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. या पोर्टलच्या माध्यमातून एका क्लिकवर लसीकरणाशी संबंधित माहिती मिळेल. तसेच लसीकरणानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची व्यवस्था देखील ‘यू विन पोर्टल’वर उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटिल यांनी दिली. या प्रणालीसाठी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर बालकांचे लसीकरण करण्यासाठी जाताना पालकांनी ‘यू विन ॲप’वर अथवा पोर्टलवर नोंदणीसाठी मातेचे आधारकार्ड, आधारकार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. या प्रणालीद्वारे लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याचीही गरज राहणार नाही. मोबाईलवरील मेसेजद्वारे लसीकरणाच्या तारखा समजू शकणार आहेत. या यू विन पार्टलवर लाभार्थी स्वतः नोंदणी करून जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊ शकणार आहेत तसेच लसीकरण कोणत्या तारखेला घ्यावे यासंदर्भातील माहिती देखील पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. तसेच लसीकरण लाभार्थ्यांचे आशा व ए. एन. एम/ एमपीडब्ल्यू सुद्धा पुर्व नोंदणी करू शकणार आहेत. लसीकरणादिवशी ही लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *