लाल मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रचंड आवक झाल्याने मिरचीच्या दरात प्रति क्विंटल १५ हजार रुपयांनी घट झाली आहे.
मिरचीच्या दरात घट झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यावरून राजकारणही तापले आहे. कर्नाटकची लाल मिरची प्रसिद्ध आहे. या मिरचीला देशासह परदेशातही मोठी मागणी असते; मात्र अचानक मिरचीच्या दरात घसरण झाली. त्यामुळे शेतकरी चिडले. आठवडभरातच मिरचीच्या दरात प्रति क्विंटल दहा ते १५ हजार रुपयांची घसरण झाली. याचा मोठा फटका लाल मिरची उत्पादक शेतकर्यांना बसला. ब्यादगी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होत असते. या समितीत मिरचीला चांगला दरही मिळतो.
बाजार समितीमध्ये ३.१ लाख पोती लाल मिरचीची आवक झाली. त्यामुळे दरात घसरण झाली. दरम्यान, बाजारात आलेल्या लाल मिरचीचा दर्जा खराब असल्यामुळे दरात घसरण झाल्याचे सांगितले जाते. सध्या लाल मिरचीला बाजारात प्रति क्विंटलला ३५ हजार रुपयांचा दर मिळत आहे. मागील वर्षी मिरचीला ५० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता; मात्र या वर्षी दरात मोठी घसरण झाली. या वर्षी मिरचीच्या लागवडीत वाढ झाली. अचानक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे मिरचीच्या दरात घसरण झाली. डिसेंबर २०२३ मध्ये मिरचीचा दर ४४ हजार रुपये प्रति क्विंटल होता. तो आता ३५ हजार रुपयांवर आला आहे. मिरचीचे कड्डी मिरची आणि गुंटूर मिरची हे दोन प्रकार प्रसिद्ध आहेत. कड्डी मिरचीचा दर ४३ हजार रुपये प्रति क्विंटलवरून ३१ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे तर गुंटूर मिरचीचा दर सोळा हजार रुपयांवरुन बारा हजार रुपयांवर आला आहे.