जांभूळ, करवंदांसह, रानभाज्यामुळे आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार

बदलापूरः बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील बाजारपेठांमध्ये रानभाज्या आणि रानमेवा दाखल झाला आहे. बदलापूर शहराची बाजारपेठ, शहराच्या वेशीवरील एरंजाड, सोनिवली परिसरासह कल्याण अहमनदगर राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी महिलांकडून रानभाज्यांची विक्री केली जात आहे. कोणत्याही मशागतीशिवाय उगवणाऱ्या या रानभाज्या पौष्टीक आणि आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असतात. त्यामुळे जून महिन्यात या रानभाज्यांना पसंती मिळते. त्यामुळे आदिवासी कुटुंबाना आणि विशेषतः महिलांना हक्काचा रोजगार मिळतो आहे.
ग्रामीण भागात दैनंदिन आहारात रानभाज्यांचे मोठे महत्व आहे. आदिवासी बांधव आपल्या जुन्या जाणत्या बांधवांनी दिलेल्या माहितीच्या जोरावर रानातून या भाजा निवडून आणतात. गेल्या काही वर्षात शहरी भागातही या रानभाज्यांना महत्व प्राप्त होताना दिसते आहे. मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसानंतर या रानभाज्या रानात बहरू लागतात. आदिवासी बांधव त्या निवडून बाजारात विक्रीसाठी आणतात. कोणत्या लागवड आणि मशागतीशिवाय या रानभाज्या वाढतात. त्यामुळे त्यांच्यात अनेक औषधी गुण असतात. जुनच्या पहिल्या आठवड्यापासून बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या भागात या रानभाज्यांची आवक वाढल्याचे दिसून आले आहे. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर आदिवासी महिला या रानभाज्या घेऊन बसलेल्या दिसतात. त्यासोबतच महत्वाचे चौक, बदलापुरच्या वेशीवर एरंजाड, सोनिवली, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, बदलापूर बारवीमार्गे मुरबाड रस्त्यावर आणि मुरबाडमध्येही या रानभाज्यांची विक्री करताना आदिवासी महिला दिसत आहेत. शेवळी, टाकळा, कुळू, कुड्याची फुले, चायवळ, तेलपट, मोहदुडी आणि लोतं या भाजा सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १० रूपये जुडीपासून ४० रूपयांपर्यंत या भाज्यांची विक्री केली जाते आहे. ग्राहकही या भाजांना पसंती देत आहेत.
संवादामुळे नवग्राहक दूरच
आदिवासी महिला रानभाज्या विक्री करताना त्याची पुरेशी माहिती देऊ शकत नसल्याने नवग्राहक या भाज्यांकडे वळताना दिसत नाही. या रानभाज्या विक्रीच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्याची माहिती जुन्या पिढीकडे अधिक आहे. त्याचीही योग्य माहिती दिल्यास नवी पिढीही या भाज्यांकडे वळेल.
जांभुळासाठीही ग्राहकांची गर्दी
सध्या बदलापुरच्या जांभळानेही बाजारात गर्दी केली आहे. १६० ते २०० रूपये प्रति किलो दराने आदिवासी बांधव या जांभळांची विक्री करत आहेत. बदलापुरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. बारवी पर्यटनासाठी येणारे पर्यटक आवडीने या जांभळांना पसंती देत आहेत. सोबत करवंदांनाही पसंती मिळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *