सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे राष्ट्रवादीतच नाराजी

मुंबई: बारामतीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना आता राष्ट्रवादीच्या कोट्यातली राज्यसभा खासदारपदाची उमेदवारी आज जाहिर झाली आणि पक्षातील नाराजीनाट्य समोर आले.

 बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार असलेल्या त्यांच्या स्वताच्या बारामती मतदार संघात प्रतिस्पर्धी सुप्रीया सुळे यंनी आघाडी घेतली होती. तरीही सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचीही चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक होते.

पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं भुजबळ नाराज असल्याचं म्हटलं जातेय. ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा सवाल बुधवारी देवगिरीवर झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष प्रश्न विचारला आहे. बुधवारी रात्री उशीरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा नाराजी नाट्याचा अंक रंगला.