लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झालेली दिसते आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखतो आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक जण आपापल्या इच्छाही बोलून दाखवतो आहे. अशाच इच्छा व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मला चार महिने द्या, या राज्यातले सरकार मला बदलायचे आहे, अशी घोषणा करून टाकली. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आता पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री बनणार अशी घोषणा एका बैठकीत केल्याचा वृत्त आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या कार्यकर्त्यांनी नानांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना लावलेल्या पोस्टरवर नानांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केल्याचे माध्यमांनी जाहीर केले आहे.
प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गुडघ्याला बाशिंग बांधून उभा असतानाच शिवसेना ठाकरे गटाने २८८ जागांवरही तयारी करायची आहे असे आदेश आपल्या संपर्कप्रमुखांना दिले आहेत. त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही २५० जागांवर लढणार अशी बातमी आली आहे. बच्चू कडू सुद्धा किमान २० जागांवर लढणार असा दावा करीत आहेत. त्याचवेळी मनोज जरांगे यांनीही मराठा समाजातर्फे राज्यातील सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे केले जातील असे जाहीर केले आहे.
या सर्व घोषणा आणि दावे बघितले तर येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे नांदेल का हा प्रश्न समोर उभा राहतो आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आश्चर्यकारकरीत्या घसघशीत यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षातल्या नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास वाढलेला आहे. त्यांना हिम्मतही आलेली दिसते आहे. त्यामुळेच हे दावे प्रतिदावे सुरू झालेले दिसत आहेत.
त्याचवेळी महायुतीतही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आम्हाला ९० जागा तरी हव्यात अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. हे बघता यावेळी महायुतीतही आलबेल राहील का अशी शंका घेण्यास वाव आहे. सध्या तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे काहीसे शांत आहेत. त्यांनी फारशी गडबड केलेली दिसत नाही. मात्र भविष्यात गडबड होणारच नाही असे नाही. तसे जर झाले तर महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात षटकोनी किंवा सप्तकोनी सामने होऊ शकतील असे चित्र दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला अनपेक्षितरित्या चांगले यश मिळाले. त्यांना महाराष्ट्र ४८ पैकी ३१ जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत महायुती ही १७ जागांवरच थांबलेली आहे. त्यातही अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आहे, आणि शिवसेना शिंदे गटाला सात जागा, तर भाजपला नऊ जागा मिळाल्या आहेत.
महायुतीतल्या महाआघाडीतल्या ३१ जागांपैकी काँग्रेसला १३ तर १ अपक्ष काँग्रेसजन आणि शिवसेनेला ९ तर राष्ट्रवादीला ७ जागा मिळाल्या आहेत. विशेषतः अजित पवार गट चाळीस आमदार घेऊन सोडून गेल्यानंतर शरद पवारांनी पूर्ण ताकद लावून स्वबळावर सात जागा निवडून आणल्यामुळे त्यांची हिम्मत बरीच वाढली आहे. म्हणूनच ते पुढील चार महिन्यात सरकार बदलण्यास दावा करीत आहेत.
तसा विचार केल्यास शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीतही देशात सरकार बदलण्याचा दवा केला होता. त्यांच्या इंडी आघाडीच्या जोरावर देशात मोदींचे सरकार हटवून नवे सरकार आणण्याची बात ते करीत होते. मात्र यावेळी मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. मतदारांनी मोदींना इशारा जरूर दिला, तरीही सत्ता मोदींच्याच हातात सोपवली. त्यामुळे इंडी आघाडीला हात चोळत बसल्याखेरीज काहीही करता आले नाही.
देशात इंडि आघाडी स्थापन करणारे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करणारे शरद पवार आता सत्ता बदलण्याचा दावा करीत आहेत. शरद पवार हे एक मुत्सद्दी आणि तितकेच मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी १९६८ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला, आणि तेव्हापासून जवळजवळ सहा दशके त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला वचक ठेवला आहे. त्यामुळे आजही पवार पूर्ण ताकद लावून आपले म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न निश्चित करू शकतात. त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र त्यासाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढायला हवी. आज तरी शिवसेना पूर्ण २८८ जागांची तयारी करणार असे म्हणते आहे. काँग्रेसचे नाना पटोले हे आम्हीच मोठे भाऊ असा दावा करीत आहेत, तर शरद पवारांचे चालू उजवे हात अनिल देशमुख हे महाआघाडीत लहान मोठा असे काहीच नसते, असे माध्यमांना सांगत आहेत.
लोकसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवल्या ख-या, मात्र तिथेही त्यांच्या कुरबुरी झाल्याच होत्या. त्यामुळेच सांगलीत काँग्रेसने बंडखोरी केली. त्याला कारण शिवसेना ठाकरे गटाचा दबाव तंत्राचा वापर हे ठरले. तिथे काँग्रेसचे नेते दबले, मात्र विशाल पाटलांसारखे कार्यकर्ते दबले नाहीत. त्यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या उमेदवाराला चारी मुंड्या चीत केले. तरीही अजूनही शिवसेनेची दादागिरी सुरूच आहे. आत्ताही विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाआघाडीतील इतर मित्र पक्षांना न विचारताच उद्धव ठाकरेंनी आपले चारही उमेदवार जाहीर करून टाकले, त्यावर नाना पटोले यांनी जाहीर रित्या नाराजी ही व्यक्त केली. मग वरून दबाव वाढला तेव्हा शिवसेनेने आपल्या दोन उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडले. या सर्व प्रकारात मने दुखावली गेली आहेत हे स्पष्ट दिसते आहे. असेच प्रकार विधानसभा निवडणुकीतही होऊ शकतात. इथे फक्त चार जागा होत्या तिथे तर २८८ जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक जागेवर प्रत्येक पक्षातून कोणी ना कोणी इच्छुक आणि उत्सुक राहणारच. अशावेळी महाआघाडी एकत्रितपणे कशी लढणार हा प्रश्नच आहे.
असे जर झाले तर मग आधी नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात षटकोनी किंवा प्रसंगी सप्तकोनी लढती देखील होऊ शकतात. अशावेळी कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही. अर्थात तिथे भारतीय जनता पक्षाचे सगळे नेटवर्क कामी येते. वाचकांना आठवत असेल की २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या तीन दिवस आधी भाजप आणि शिवसेना युती तुटली. लगेचच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीही तुटली. त्यावेळी प्रत्येक मतदारसंघात चौरंगी लढती झाल्या होत्या. या लढतीत भाजपाने एक हाती १२२ जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत सर्व काही आलबेल होते. यावेळी तशी परिस्थिती नाही. तरीही पुढील चार महिन्यात भाजपचे नेतृत्व झालेल्या चुका दुरुस्त करून निवडणुकांना सामोरे जाऊ शकते. सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गटही त्यांच्यासोबत राहील असे चित्र जर राहिले तर त्यांना झुकते माप मिळण्याची संधी जास्त राहील हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. तरीही शरद पवारांनी पुढच्या चार महिन्यात हे सरकार घरी बसवण्याची मनीषा व्यक्त केली आहे. तर संजय राऊत यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री झालेले बघायची इच्छा आहे. त्या दृष्टीने ते दोघेही जमल्यास एकत्रितपणे न जमल्यास एकला चालो रे या भूमिकेतून प्रयत्न करतीलच. त्यासाठी आपण सर्वच त्यांना शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात ना….
