श्रध्दांजली

मकरंद मुळे

आपल्यासाठी खूप धक्कादायक असत. कुटुंबावर आभाळ कोसळत. होत्याच नव्हतं होत. मात्र, नियतीला ठाऊक असत. श्वासांचा हिशोब हिशोब जो ठेवतो त्याला ज्ञात असत. आपण अनभिज्ञ असतो. आशेवर जगत असतो. चमत्कार होईल असे वाटून घेत असतो. स्वतःला समजवत असतो. आपल्यासाठी मृत्यू अचानक असतो. मृत्यूला सार काही माहिती असते.
याचा प्रत्यय कल्पक, प्रयोगशील प्रकाशक माधव जोशी यांच्या निधनाने पुन्हा एकदा आला आहे. एप्रिल महिन्यात वयाच्या सहासष्टव्या वयात पदार्पण करणारे माधव जोशी अवघ्या आठ दिवसात कोसळले, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि कायमचे निघून गेले. गेली काही वर्ष मधुमेहाने ग्रस्त त्यामुळे त्रस्त झालेले आमचे माधवराव काहीवेळा निर्वाणीची भाषा करत असत. पण, काम चालू ठेवले होते.
माधव जोशी यांचे बालपण ठाण्यातील तत्वज्ञान विद्यापीठात गेले. त्यांचे वडील पांडुरंग शास्त्री आठवले यांचे सहकारी होते. स्वाभाविकच माधव जोशी यांच्या जडणघडणीवर तेथील वातावरणाचा परिणाम होता. मो. ह. विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर माधव जोशी यांनी रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. माधव जोशी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांची ओळख तिथली. अभाविपच्या संपर्कात आलेल्या माधव जोशी यांनी मानसशास्त्र विषयात एम.ए. ची पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना विद्यार्थी विस्तारक म्हणून मुंबईच्या मध्य विभागात काम केले. त्यानंतर पूर्व मुंबईत काम केले होते. गुजरातच्या राजकोट येथे पूर्णवेळ काम केले होते. अभाविपचे पाच वर्ष पूर्णवेळ काम करताना १९८३ साली गोवाहटी येथे घुसखोरी विरोधी आंदोलनात सहभागी झाले होते. अभाविपचे पूर्णवेळ काम थांबवल्यावर मेघालय आणि आसाम येथे दोन वर्ष नोकरीच्या निमित्त वास्तव्य केले होते.
तेथून परत आल्यावर चरितार्थासाठी माध्यम क्षेत्र निवडले होते. फ्री प्रेस, मुंबई तरुण भारत आणि ग्रंथाली येथे काम केल्यानंतर स्वतःच्या प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली होती. परम मित्र प्रकाशनाचा कल्पक, प्रयोगशील पट आखला होता. व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर सुरु केला होता. प्रकाशन व्यवसाय यावर्षी पाव शतक पूर्ण करेल. आपल्या व्यवसायाची पंचविशी बघण्यासाठी आता माधव जोशी नाहीत. सुरुवातीला द्वैमासिक प्रसिद्ध करून सुरुवात केली होती. त्यानंतर पुस्तक प्रकाशन सुरु केले. आतापर्यंत सुमारे दोनशे अठ्ठावीस पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. यातील बहुतेक सर्व पुस्तकंही माधव जोशी यांच्या टर्म्स आणि कंडिशनवर प्रकाशित झाली आहेत. एका टप्यानंतर माधव जोशी यांनी आपल्या चॉईसच्या आधारे माणसं जोडली होती. त्यांच्या मैत्र यादीत सहभागी होण्यासाठी स्पष्टवक्तेपणा पलीकडचा फटकळपणा याची सवय असणे आवश्यक होते. त्यांचे मित्र विविध विचारांचे होते. भिन्न-भिन्न विषयांचे वाचन, माहिती आणि त्याचा एक वेगळा अर्थ मांडणे हे माधव जोशी यांचे वैशिष्टय होते. हे वेगळेपण लेखक आणि पुस्तक यातून दिसत असे. ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहंदळे यांनी छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचे इंग्रजीत दोन खंडात विस्तृत चरित्र लिहिले होते. माधव जोशी यांनी हे शिवधनुष्य पेलेले होते. त्या खंडाच्या प्रकाशनाने प्रकाशन व्यवसायात परममित्रने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. वैचारिक आणि व्यावसायिकदृष्ट्या प्रकल्प यशस्वी झाला होता. हे सगळं करत असताना तब्येतीची तक्रार काही वेळा माधव जोशी यांना चिडचिड करत असे. मात्र, वेगळं काही करण्याची ऊर्जा त्यांनी कायम ठेवली होती.
आनंद आणि उभारी देणाऱ्या दोन घटना अगदी नुकत्याच घडल्या होत्या. प्रा. डॉ. अशोकराव मोदक यांनी लिहिलेले आणि परम मित्र ने प्रसिद्ध केलेले ” अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद” हे पुस्तक ठाण्यात एक मोठया कार्यक्रमात प्रसिद्ध झाले होते. आचार्य गोविंददेवगिरी महाराज आणि रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला होता. सदर पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या कार्यक्रमानंतर प्रकाशन व्यवसायातील विशेष कामगिरीबद्दल ठाण्यातील रोटरी क्लबने त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. या दोन कारणांनी त्यांचे कुटुंब उत्साहात होते. मात्र या दोन्ही वेळी त्यांची प्रकृती हा त्यांना भेटणाऱ्यांच्या काळजीचा विषय होता.
दिनांक चार जून रोजी अरुण करमरकर, शरद गांगल, रवींद्र कर्वे हे राजू ( श्रीकृष्ण ) हंबर्डे यांच्या घरी निकाल ऐकण्या आणि बघण्यासाठी एकत्र जमले होते. माधव जोशी त्यातही सहभागी झाले होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने ते लवकर घरी परतले होते. मंगळवारचा तो दिवस घरी झोपून काढला होता. बुधवारी त्रास सुरु झाला होता. सायंकाळी रुग्णालयात दाखल केले होते. बुधवार दिनांक पाच ते बुधवार दिनांक बारा असा जगण्या-मरण्याचा संघर्ष सुरु होता. तो रात्री संपला. प्रकाशन व्यवसायात वेगळी वाट चालणारे माधव जोशी कायमचे थांबले.
उंधियो पार्टी हे माधव जोशी यांच्या घरी जमण्याचे वर्षातून एकदा कारण असायचे. यंदा ती झाली नव्हती. ठाण्यातील विद्यार्थी परिषदेचे जुने आणि सिनियर कार्यकर्ते सहकुटुंब स्वाती जोशी यांच्या हातच्या स्वादिष्ट उंधियोचा आस्वाद घेण्यासाठी एकत्र येत असत. गेल्या काही वर्षांपासून त्यात माझा प्रवेश झाला होता. माधव जोशी यांच्याशी कार्यकर्ता म्हणून ओळख अभाविप ठाण्याच्या अभ्यासवर्गातील वक्ते म्हणून झाली होती. ती हळूहळू मैत्रीत रूपांतरित झाली होती. महिन्यातून दोनदा माधव जोशी यांच्या घरी दोन कप चहावर सगळ्या विषयांवर भरपूर गप्पा हा ठरलेला कार्यक्रम होता. पटणार, न-पटणार घर ते जग कोणतेच विषय वर्ज्य नव्हते. ऐकणारे , समजून घेणारे, समजावून सांगणारे , कधी आपुलकीने रागवणारे ज्येष्ठ मित्र माधव जोशी आता गप्पांसाठी नसतील.
संघटनेचे असूनही संघटनेच्या मोहात अड्कले नाहीत. जो विचार अंगिकारला त्याचा गवगवा न करता त्याच्याशी प्रामाणिक राहिले. सगळ्यात राहून आपला एक वेगळा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जपला होता. माधव जोशी यांच्या अकस्मिक जाण्याने व्यक्त होत असलेली हळहळ ही ब्रँड परममित्र प्रकाशन याची ओळख आहे. सुविद्य पत्नी स्वाती जोशी, उच्चशिक्षित मुलगी मुदिता आणि मुलगा भास्वान माधव जोशी यांची आठवण म्हणून परममित्र ला अधिक सक्षम करतील. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करणाऱ्या माधव जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *