काहीतरी नवीन…

श्याम तारे

जगाच्या एखाद्या भागात वर्षानुवर्षे पावसाने दडी मारावी आणि ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी परिस्थिती यावी ही दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल आणि ही गोष्ट जर एका शहराची असेल आणि तिथली लोकसंख्या २ कोटीपेक्षा अधिक असेल तर पिण्याच्या पाण्यावाचून या लोकसंख्येचे किती हाल होत असतील याची कल्पनाच करता येणार नाही.
तर ही गोष्ट आहे मेक्सिको शहराची. इथे गेली अनेक वर्षे अगदी तुरळक पाउस पडतो आहे. शहरातली सर्वात मोठी पाणी व्यवस्था फारसे काही करू शकत नाही. येत्या काळात पाउस लवकर आणि पुरेसा झाला नाही तर शहराजवळ केवळ जून महिन्याच्या अखेरपर्यंत जेमतेम पुरेल इतकेच पाणी असेल. आजच काही घरांमध्ये वापरू नये इतके प्रदूषित पाणी उपयोगात आणले जात आहे. त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम तर दिसतीलच पण असे मानले जाते की पाणी उपलब्धता आणि वापर यांचा असमतोल या सगळ्याला कारणीभूत आहे.
नशिबाने शहर भूजलाच्या बाबतीत सुखी मानले जात आहे. त्यामुळे शहरात आज मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा सुरु आहे. परंतु हा निर्णय अखेर जनतेच्या विरोधातच जाणार आहे. कारण काय तर पाण्याच्या अशा उपशामुळे इथली जमीन देखील दरवर्षी ५ इंच या वेगाने धसते आहे. या सगळ्यामुळे प्रश्न हवामान बदलामुळे हे होते आहे का असा निर्माण झाला आहे.
हवामान बदल कुणी नाकारीत नसला तरी मानव निर्मित कारणे देखील यासाठी आहेतच हे मान्य करावे लागेल. पण यावर उपाय करायचा तर सर्वात पहिला उपाय पाणी कमी वापरा असा सांगितला गेला. असे केले गेले नाही तर ‘शून्य दिवस’ म्हणजे पाण्याविना राहण्याचा दिवस अशी पाली येऊ शकेल. पाणी वाचविण्यासाठी दुसरा उपाय वाया जाणारे पाणी वाचवण्याचा आहे. त्यासाठी जनतेत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी परिस्थिती काय आहे हे जनतेसमोर मांडले जात आहे आणि पाणी वापरावर स्वत:च बंधन घालून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
पाणी टंचाईवर आणखी एक उपाय असतो तो म्हणजे उपयोगात आलेल्या पाण्याचे पुनर्चक्रांकन म्हणजे रिसायक्लिंग करणे हा आहे, यामधून निदान पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त जे पाणी लागते ते मिळू शकेल आणि पिण्याचे पाणी काही प्रमाणात पुरवता येईल. ते जलवाहिन्या दुरुस्ती न झाल्यामुळे पाणी वाहून चालले आहे त्यामुळे पाणी वाया जाते आहे ही तूट मोठी आहे आणि ती भरून काढण्यासाठी जनता आणि शासन या दोघांनीही प्रयत्न करण्याचे आवश्यकता आहे.
आपल्यापुरते म्हणाल तर ही परिस्थिती आपल्यावर येणार नाही यासाठी पुढच्याला ठेच मागच शहाणा या न्यायाने आपण उपाय योजना आखून कृती करणे सुरु करायला हवे…
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *