कपिल पाटील यांचे चोख प्रत्युत्तर, विधानसभा निवडणुकीत एकत्र मतदानासाठी आरोप
भिवंडी : भिवंडीतील एकही मुस्लिम नागरिक माझ्यावर दंगल घडविण्याचा आरोप करणार नाही. खासदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत भिवंडी शहरात एकही दंगल झालेली नसून, हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत आहे. दंगलीबाबत विधाने करीत मुस्लिमांची दिशाभूल करून लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकत्र मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शक्यता व्यक्त करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. तसेच हिंदू धर्म सभा व संत संमेलनाचा कार्यक्रम हा सकल हिंदू समाजाचा असून, नवीननवीन लोकप्रतिनिधी झालेल्या लोकप्रतिनिधींना विजय पचनी पडत नाही. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला लगावला.
भिवंडी तालुक्यातील पडघा येथे शनिवारी सायंकाळी संत संमेलन व हिंदू धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. त्याला तेलंगणचे आमदार टी. राजा सिंह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे कपिल पाटील फौंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले असून, भिवंडीत दंगली घडविण्याचा डाव आहे, असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला होता. या आरोपांना कपिल पाटील यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. या संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजाने केले आहे. परंतु, कपिल पाटील फौंडेशनला ही संधी मिळाली असती, तर भाग्यवान समजलो असतो, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली.
यापूर्वी २०१५ मध्ये कामतघर येथील वऱ्हाळदेवी तलावालगत टी. राजा सिंह यांची सभा झाली होती. त्यानंतर भिवंडीत दंगल घडलेली नव्हती. गेल्या दहा वर्षांत हिंदू मुस्लिमांबरोबरच सर्व समाज व जातीबांधव गुण्यागोविंदांने राहत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मुस्लिमांचे एकत्रित मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शक्यता श्री. कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
हिंदू धर्माच्या जागृतीबाबत आयोजित केलेल्या संमेलनाला विरोध केला जात आहे. टी. राजा सिंह यांची सभा घेऊ दिली जाणार नाही, असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला. अशा प्रकारे संत-महंतांचा अपमान शिवसेना उद्धव ठाकरे गट सहन करणार आहे का. उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिमानाने हिंदूत्व सोडले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेच्या भिवंडीतील अनुयायांना हा प्रकार मान्य आहे का, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारणार का, असे आव्हान माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले.
अनधिकृत बांधकामांबाबत वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात आला. सुरेश म्हात्रे यांनी स्वत: आपल्या बांधकामांसाठी स्थगिती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या बांधकामांना माझे संरक्षण होते का? भिवंडी अनधिकृत बांधकामांपासून मुक्त करावयाची असल्यास, स्वतचा जेसीबी घेऊन स्वत:ची अनधिकृत बांधकामे पाडावीत, असे आव्हान कपिल पाटील यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवे धोरण आणल्यामुळे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. पण खासदार झाल्यावर पहिल्याच दिवशी या शेतकऱ्यांच्या मुलांचे उत्पन्न बंद करण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका श्री. कपिल पाटील यांनी केली.
सुरेश म्हात्रे यांच्याकडून केल्या जाणारे निराधार आरोप सहन केले जाणार नाहीत. याप्रकरणी कायदेशीर दावा दाखल केला जाईल, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला.
भिवंडीत पोलिसाला मारहाणीकडे केले दुर्लक्ष
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी शहरात दिवसांपूर्वी पोलिसाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावेळी सुरेश म्हात्रे कोठे होते. त्यावेळी ते पुढे का आले नाहीत, असा सवाल कपिल पाटील यांनी केला.
